लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडणे विनयभंग नव्हे; हायकोर्टाचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 07:02 PM2023-02-28T19:02:44+5:302023-02-28T19:03:08+5:30
Nagpur News लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीचा हात पकडणे व ती आवडत असल्याची भावना व्यक्त करणे, ही कृती विनयभंगाच्या गुन्ह्यात मोडत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणातील प्राथमिक बाबी अन् कायदेशीर तरतुदी लक्षात घेता नोंदविले.
राकेश घानोडे
नागपूर : लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीचा हात पकडणे व ती आवडत असल्याची भावना व्यक्त करणे, ही कृती विनयभंगाच्या गुन्ह्यात मोडत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणातील प्राथमिक बाबी अन् कायदेशीर तरतुदी लक्षात घेता नोंदविले. तसेच, संबंधित आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. प्रकरणावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी निर्णय दिला.
धनराज बाबुसिंग राठोड असे आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने ऑटोरिक्षा चालक आहे. त्याच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ३५४-ए, ३५४-डी व पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. आरोपीला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाला प्रथमदृष्ट्या या प्रकरणात लैंगिक छळ दिसून आला नाही. आरोपीने लैंगिक हेतू ठेवून मुलीचा हात पकडला होता, अशी तक्रार नाही. त्याने मुलगी आवडत असल्याची भावना व्यक्त केली, हे गृहित धरले तरी, त्यामागे त्याचा लैंगिक हेतू होता, हे मुलीच्या जबाबात कुठेच दिसून येत नाही. याशिवाय, पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून विशेष सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यामुळे आरोपीला अटक करण्याची गरज नाही, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले. तसेच, न्यायालयाने आरोपीला भविष्यात पुन्हा असे कृत्य करू नको, मुलीसोबत कोणत्याही माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, अन्यथा अटकपूर्व जामीन रद्द केला जाईल, अशी तंबीही दिली.
अशी आहे घटना
ही घटना घडली त्यावेळी पीडित मुलगी १७ वर्षे वयाची होती. ती आरोपीच्या ऑटोरिक्षाने शाळेत जात होती. काही दिवसांनी तिने आरोपीचा ऑटोरिक्षा बंद केला. ती बसने शाळेत जायला लागली. आरोपीचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते. परंतु, मुलीला आरोपी आवडत नव्हता. ती आरोपीला टाळत होती. असे असतानाही आरोपी तिचा सतत पाठलाग करीत होता. १ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपीने मुलीला अडवून मोटरसायकलवर बसण्याचा आग्रह केला. मुलीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा हात पकडला व ती आवडत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मुलगी तेथून पळून गेली. तिने वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे वडिलाने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविली.