नागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची ७५ महिन्यांची थकबाकी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन (इंटक) च्यावतीने बुधवारी मनपा कार्यालयापुढे धरणे देण्यात आले.
सहाव्या वेतन आयोगाची ५९ महिन्यांची तर सातवा वेतन आयोगाची १६ महिन्यांची थकबाकी नियमित व सेवानिवृत कर्मचारी, शिक्षकांना मिळावी. सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार १० ,२०,३० या वर्षाची प्रगती योजना लागू करावी, ऐवजदार सफाई कामगारांना नियमित करण्यासाठी २० वर्षांची अट रद्द करून अधिसंख्य पदे नियमित आस्थापनेत घ्यावी, तसेच त्यांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करून वारसा हक्क अबाधित ठेवणे, महापालिकेतील सर्व पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात. आदी प्रमुख मागण्यांसाठी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे , सेवानिवृत कर्मचारी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भीमराव मेश्राम ,धर्मदास मेश्राम, ईश्वर मेश्राम, प्रवीण तंत्रपाळे ,संजय मोहले ,अरुण तुर्केल , अशोक खाडे ,अब्दुल गफ्फार शेख ,संजय गाटकिने , प्रकाश चमके, ओंकार लाखे आदींनी सभेत संबोधित केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.