नागपूर : बुधवारी सायंकाळी शहरात ५४३ सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन करण्यात आले. दरम्यान होळी आणि गुरुवारी होणाऱ्या धुलिवंदनासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. विभागनिहाय विचार केला असता परिमंडळ एकमध्ये १०४ ठिकाणी, दोनमध्ये १२३, तीनमध्ये २०५ आणि चारमध्ये १११ ठिकाणी सार्वजनिकरीत्या होळी दहन करण्यात आले. होळीचे दहन शांततेत पार पडले. गुरुवारी धुलिवंदन आहे. धुलिवंदनही शांततेत पार पडावे, यासाठी नागपूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या उत्सवादरम्यावन क्षुल्लक घटनेची व तक्रारीची तात्काळ दखल घेतली जाणार आहे. तसेच त्यावर कायदेशीर कारवाई करून प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केली जाईल. धुलिवंदनाच्या दिवशी फुग्यात पाणी भरून एकमेकांना मारण्याचे प्रकार घडत असतात. ते होऊ नयेत, यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच जोरात वाहने चालवून तरुण ओरडत जात असल्याचे प्रकार घडतात. यामुळे इतरांना त्रास होतो, अपघातही होतात. अशा तरुणांवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)दहा ठिकाणी आगनागपूर : होळीच्या दिवशी शहरात तब्बल दहा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. यामुळे अग्निशमन विभागातील जवानांची चांगलीच तारांबळ उडाली. बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास भंडारा रोडवरील कापसी येथील आरामशीनला लागली. थोड्याच वेळात आगीने भीषण रुप धारण केले. अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळताच सहा गाड्या घटनास्थळी पोहचल्या. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन विभागाच्या कळमना, लकडगंज, कॉटन मार्केट केंद्रावरील गाड्या बोलावण्यात आल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांना दोन तास चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याची शंका आहे. आगीत सागवान लाकूड, फर्निचर व तीन आरामशीनचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दुपारी अमरावती मार्गावरील नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस मधील गवताला आग लागली. येथे अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या पाठविण्यात आल्या. ही आग इतरत्र पसरण्याचा धोका होता. परंतु आग वेळीच आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. तसेच टेका नाका, लोणार गाव, महाराज बाग, शाहू गार्डन आदी ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.
५४३ ठिकाणी होळी दहन
By admin | Published: March 24, 2016 2:34 AM