कोराडी : वीज वितरण कंपनीच्या वतीने मीटर वाचननुसार वीज देयके न दिल्याने व अंदाजित दिलेल्या वीज बिलाची वसुली करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिल्याने लोनखैरी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी आंदोलन केले. वीज वितरण कंपनीच्या देयकाची होळी करण्यात आली. सरपंच लीलाधर भोयर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला उपसरपंच बोधिसत्त्व झोडापे, विजय आजनकर, उमाकांत आजनकर, माजी सरपंच सुशील भोयर, दिलीप आजनकर, सिद्धार्थ जामगडे, गणेश डेहनकर, विनोद आजनकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतासाठी दिलेल्या कृषी पंपाच्या मीटरचे नियमित वाचन (रीडिंग) घेतले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर वीजबिलाचा मोठा बोजा पडतो. आम्हाला वीज वितरण कंपनीने दर महिन्याच्या मीटर वाचनानुसार बिल द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या संदर्भात सरपंच लीलाधर भोयर यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून शेतकऱ्यांची तक्रार मांडली.
शेतकऱ्यांनी केली वीज बिलाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:13 AM