लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिले माफ न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. वीजबिलांची होळी करत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सकाळी शहरातील सुमारे दीडशे ठिकाणी आंदोलन झाले.
पूर्व नागपुरातील २४ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा कोठे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारने जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम केल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला. याशिवाय शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आंदोलन झाले. त्यात आ.अनिल सोले, आ.मोहन मते, माजी आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे, विनोद कन्हेरे, किशोर पलांदुरकर, संजय अवचट, संजय चौधरी, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, अश्विनी जिचकार, दयाशंकर तिवारी यांची उपस्थिती होती.
भाजयुमोदेखील आक्रमक
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे १० नंबर पुलियाजवळ वीज बिले जाळण्यात आली. राज्य शासनाने जनतेचा विश्वासघात केला असून वीजबिलमाफी त्वरित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमोचे शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांनी दिला. यावेळी भाजपा उत्तर नागपूर अध्यक्ष संजय चौधरी, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांच्यासह राहुल खंगार, सचिन करारे, कमलेश पांडे, सचिन सावरकर, अमेय विश्वरुप, अमित पांडे इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
कुणाचीही वीज कापू देणार नाही
भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात तुळशीबाग उपकेंद्रसमोर वीज बिले जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. अन्यायकारक बिले वापस घ्यावीच लागतील. १०० युनिट मोफत देण्याची घोषणा राबवावी लागतीलच. नागरिकांनी वाढीव बिल भरू नये. चुकीचे बिल देऊन जर वीजजोडणी कापण्याचा प्रयत्न केला तर भाजप त्याचा विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.