नागपूर: होळीला अजून सात दिवसांचा कालावधी असला तरी रेल्वे गाड्या आणि खाजगी प्रवासी बसमध्ये प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत आहे. दिल्ली आणि मुंबई मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये लांबलचक प्रतीक्षा यादी बघायला मिळत आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांनंतर गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा मिळते की नाही, अशी स्थिती आहे.
विशेष म्हणजे, अनेक जण होळी व धुळवड आपल्या गावी जाऊन नातेवाइकांसोबत साजरी करतात. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरात आधी ११२ आणि मध्य रेल्वेने नंतर १२ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घोषित केला आहे. मात्र, गाड्या वाढल्या तरी प्रवाशांची गर्दी एवढी जास्त आहे की या गाड्यांमध्येही आरक्षण मिळेनासे झाले आहे. दिल्ली मार्गावरील गाड्यांमध्ये तर जनरल डब्यातही प्रचंड गर्दी आहे. १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये स्लीपर आणि थर्ड एसीचे तिकीट मिळेनासे झाले आहे. १२६१५ जीटी एक्स्प्रेसमध्ये स्लीपर श्रेणीची तशीच अवस्था आहे. १२६२१ तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये स्लीपर आणि सेकंड एसीचे तिकीट देणे बंद करण्यात आले आहे. २२६९१ राजधानी एक्स्प्रेसच्या सर्व श्रेणीतील तिकीट बुक झालेले आहेत. १२२३ तेलंगणा एक्स्प्रेसची स्थितीही काहीशी अशीच आहे.
मुंबई मार्गावर धावणाऱ्या १२१४० सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी आहे. तर, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसच्या सर्वच श्रेणीच्या तिकिटांमध्ये लांबलचक प्रतीक्षा यादी बघायला मिळत आहे.
गीतांजली एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, तसेच दुरंतो एक्स्प्रेसमध्येही मोठी प्रतीक्षा यादी बघायला मिळत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या गरीब रथमध्ये मोठी प्रतीक्षा यादी आहे. तर, महाराष्ट्र एक्स्प्रेस, आजाद हिंद एक्स्प्रेस मध्ये २२ तारखेनंतर कोणतेच तिकीट उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.
ट्रॅव्हलवाल्यांची चांदी
रेल्वे गाड्यांमध्ये अशी गर्दी झाल्याचे पाहून ट्रॅव्हल्सवाल्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर, शिवणी, बालाघाट, पचमढी, बालाघाट, छत्तीसगडमधील राजनांदगाव, डोंगरगड, दुर्ग, रायपूर, आंध्र प्रदेशातील आदिलाबाद त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांतील तरुण मोठ्या संख्येत रोजगाराच्या निमित्ताने राहतात. ही मंडळी होळी धुळवडीचा सण आपापल्या गावात जाऊन नातेवाईक मित्रमंडळी सोबत साजरा करण्याचा बेत आखतात. रेल्वेगाड्यात आरक्षण मिळेनासे झाल्यामुळे ते ट्रॅव्हल्सकडे धाव घेतात. अचानक वाढलेल्या गर्दीचा फायदा उठवत ट्रॅव्हल्सवाल्यांनीही तिकिटाचे दर पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढविल्याची ओरड आहे.