नागपूर : फाल्गुन पौर्णिमा अर्थात धुलिवंदनानिमित्त विविध बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रंग, गुलालासह विविध प्रकारच्या डिझाईनच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची बाजारात रेलचेल आहे. दूरवर गुलाल उडविणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या पायरो गन्स विक्रीस आल्या आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स पिचकारी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या पिचकारीची किंमत २ हजार रुपयांपर्यंत आहे.
यावर्षी धुलिवंदन सोमवार, २५ मार्चला साजरा होणार आहे. लहान मुलांकडून दरवर्षी विविध प्रकारच्या पिचकाऱ्यांची मागणी वाढते. त्याकरिता किंमत दुय्यम बाब असून केवळ आवडती वस्तू हवी, असा त्यांचा अट्टहास असतो. बॅटरीवर चालणाऱ्या पिचकारीची मागणी वाढत किंमत एक हजार रुपयांपासून आहे. याशिवाय होळीमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाल उडविण्यासाठी खास सिलिंडर्स आले आहेत. पायरो गन्स आणि गुलाल सिलिंडर धुलिवंदन सणात उत्साह वाढविणारे आहेत. या वसतू इतवारी, लोहा ओळीतील घाऊक विक्रेत्यांकडे विक्रीस आहेत.
हर्बल गुलाल व रंगाकडे अनेकांचा ओढागेल्या काही वर्षांपासून लोक आरोग्यप्रति अधिक जागरूक झाले आहेत. त्यातच त्वचाप्रेमींचा हर्बल गुलाल आणि रंगाकडे ओढा वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. साधा गुलाल १०० ते १५० रुपये आणि हर्बल गुलालाची किंमत ५०० ते ७०० रुपये किलो आहे. हा गुलाल लहान प्लास्टिकच्या डब्यामध्येही विक्रीस आहे. शिवाय रंगाची किंमतही एक हजारावर आहे. हे नैसर्गिक रंग खरेदीवर लोकांचा भर असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. शिवाय विविध आकार आणि प्रकारातील मास्क विक्रीस आहेत.
यावर्षी किमतीत १५ ते २० टक्के वाढयावर्षी पिचकारी, मास्कच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारात उपलब्ध बहुतांश वस्तू ‘मेड इन इंडिया’ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘मेड इन चायना’ आऊट झाल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. मेक इन इंडियामध्ये लोकांना गणेश, मूर्गा आणि तोता ब्रँडचे रंग जास्त पसंतीचे आहेत. तसेच चांगल्या दर्जाचे गोल्डन रंग आणि वार्निश पॅकिंगमध्ये आहेत. यंदा सर्वाधिक उलाढाल होण्याची व्यावसायिकांना अपेक्षा आहे.