- सकाळपासून लगबग, दुपारीच रचून ठेवल्या होत्या राशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनमानसात संस्कृतीचे हस्तांतरण अव्याहत सुरू आहे आणि सणोत्सवाच्या माध्यमातून उत्साह, जाणिवेचा प्रवाह अखंडितपणे वाहतो आहे. होलिकादहन हा सणही त्याच संस्कृतीचा, उत्साहाचा अन् जाणिवेचा सोहळा आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर साजरी झालेली ही दुसरी आणि टाळेबंदीच्या कठोर बंधनात साजरी झालेली ही पहिली होळी आहे. गेल्यावर्षी होळीनंतर देशभरात टाळेबंदी लागू झाली होती तर टाळेबंदीचा घाट अन् संक्रमणाचा वेग बघता यंदा कोरोना नियमांचे आवरण होलिकात्सवाला लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी शहरात नागरिकांनी कमालीचा संयम दाखवला आणि सजगतेचा परिचयही करवून दिला. रात्री ८ वाजतानंतर संचारबंदी घोषित असल्याने नागरिकांनी, मंडळांनी होलिकादहन संध्याकाळी सूर्यास्तालाच केले.
शहरात दररोज कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ मार्च दरम्यान टाळेबंदी लागू झाली होती. त्यानंतरही दररोज संक्रमितांचे आकडे तीन ते चार हजारांनी वाढत असल्याच्या स्थितीत टाळेबंदीचा काळ अंशत: शिथिलतेसह वाढविण्यात आला. होळीच्या पर्वावर बाजारात गर्दी उसळण्याची शक्यता व धुळवडीला असणारा रंगोत्सव, यामुळे मुख्यमंत्र्यांनी रविवारीच राज्यात रात्रीच्या वेळी कठोर संचारबंदी घोषित केली आहे. शिवाय, सोमवारी पूर्णत: बंद अशी स्थिती असणार आहे. नागरिकांनीही या घोषणेचा आदर करत आणि आपल्या परंपरा जपत रविवारी होलिकादहन साजरे केले. कुविचार आणि दुष्प्रवृत्ती अग्नीत भस्मसात करण्याचा उदात्त संदेश देणारा होलिकादहन हा सण नागरिकांनी कोरोना भस्म होवो, अशा प्रार्थनेने साजरा केला. शहरात अनेक ठिकाणी होलिका उत्सव सामूहिकरीत्या साजरा होतो. रविवारीही अशाच तऱ्हेने साजरा झाला. मात्र, त्यात गर्दी टाळण्याचे प्रयत्न सर्वस्तरातून होत असल्याचे दिसून येत होते. सर्वत्र शांततेने होलिकेच्या राशी अर्थात लाकडे, गोवऱ्या आदी रचून ठेवल्या होत्या. होलिकादहनानंतर प्रत्येक जण होलिकेचे पूजन करतात आणि नंतर रंग खेळून दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुळवडीची आधारशिला ठेवत असतात. यंदा मात्र, बहुतांश नागरिकांनी या परंपरेला तडा देण्याचा प्रयत्न केला. दुरूनच गुलालाची उधळण करत सर्वांनी होलिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.