बौद्ध शिष्टमंडळाची श्रीलंकेला भेट : श्रीलंकेच्या पुरातत्त्व विभागाने दिली मान्यता नागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी भारतात आणण्यासाठी श्रीलंकेच्या पुरातत्त्व विभागाने मान्यता प्रदान केली, अशी माहिती माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देतांना कुंभारे यांनी सांगितले, तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी भारतात आणण्यासाठी बौद्धांचे एक शिष्टमंडळ नुकतेच श्रीलंकेला भेट देऊन आले. या शिष्टमंडळात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, नितीन गजभिये, अभिनेते गगन मलिक आणि ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख म्हणून मी स्वत: सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने श्रीलंकेच्या पुरातत्त्व विभागाशी चर्चा करून पवित्र बुद्ध अस्थी भारतात आणण्यासाठी मान्यता मिळविली आहे. येत्या १४ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर पर्यंत बुद्ध अस्थिकलशाचे भारतात आगमन होणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त २२ आॅक्टोबर रोजी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी २१ व २२ आॅक्टोबर रोजी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेसाठी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करण्यात आले असल्याचे सुलेखा कुंभारे यांनी सांगितले.
गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी भारतात येणार
By admin | Published: October 03, 2015 3:21 AM