भाग (३) (लोगो घ्यावा)
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सुमारे १५३६ शाळांपैकी ४१५ शाळांचे बिल थकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही परिस्थिती गेल्या ५ वर्षांपासून कायम आहे. ज्या शिक्षकांना घरात, गाडीत एसी लागतो, त्या शिक्षकांना वर्गात पंखाही उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संपूर्ण राज्यात डिजिटल शाळा, ई-लर्निंग हे उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र शाळांचा विद्युत पुरवठाच खंडित असल्याने डिजिटल आणि ई-लर्निंग शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांना पूर्वी वीज बिल भरण्यासाठी सादिल अनुदान मिळायचे किंवा शाळा सुधारच्या माध्यमातून हे बिल भरले जात होते. परंतु २०१२-१३ पासून सादिल अनुदान बंद झाले. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानातून भरण्याची तरतूद होती. परंतु केंद्र सरकारने शाळेच्या अनुदानात कपात केली. त्यामुळे शिक्षक संघटनांनी शाळांचे वीज बिल ग्रामपंचायतीने भरावे अशी मागणी सीईओंकडे केली होती. त्यावर सीईओंनी ग्रामपंचायत कायद्याचा हवाला देत शाळांचे वीज बिल भरण्याचे निर्देश दिले. परंतु ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन मर्यादित असल्याने शाळांचे वीज बिल भरण्यास नकार दिला. परिणामी शाळांचे वीज बिल थकले आणि महावितरण शाळेचे वीज कनेक्शन कापत गेली.
- १०३६ शाळा डिजिटल
शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १०३६ शाळा डिजिटल आहेत. यात १५४ शाळा ॲण्ड्रॉईड टीव्ही डिजिटल, २३५ शाळा एलईडी टीव्ही डिजिटल व ६४७ शाळा ह्या संगणक/प्रोेजेक्टरच्या माध्यमातून डिजिटल झाल्या आहेत. वीजच नसेल तर अर्थ काय?
- सौर ऊर्जेचाही प्रकाश शाळेत पोहोचला नाही
जिल्ह्यात शंभर टक्के शाळा सौर ऊर्जेच्या प्रकाशावर आणण्याचा मानस तत्त्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला होता. पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) तून जिल्हा परिषदेच्या २८७ शाळांकरिता ४.२८ कोटींचा निधी ‘मेडा’ ला वळता केला होता. पुन्हा खनिज प्रतिष्ठानातून सौरऊर्जेसाठी ७ कोटी ३१ लाखांवरचा निधी मंजूर केला. यातून ५३० शाळा सौर पॅनलवर येणार होत्या. परंतु अजूनही सौर ऊर्जेचा प्रकाश शाळांमध्ये पोहोचला नाही. त्या निधीचाही पत्ता नाही.
- पंचायत समितीनुसार वीज बिल थकित असलेल्या शाळा
पंचायत समिती शाळांची संख्या थकित बिल (रुपयात)
नागपूर ४३ ३,३६,०००
हिंगणा ६८ २,८०,९७०
उमरेड ४४ २,९९,७३५
कळमेश्वर २६ १,३७,८३०
नरखेड १४ ८७९६०
काटोल ३३ १,५०,६३६
मौदा ६४ ४,२६,६६०
पारशिवनी ४१ १,३५,४३०
कुही ३३ १,४९,७७३
सावनेर ४९ ३,०८,२६३
कामठी माहिती अप्राप्त -
भिवापूर माहिती अप्राप्त -
रामटेक माहिती अप्राप्त -