जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनदरम्यान अनेकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा सहन करावा लागतो आहे. दुसरीकडे दारू, गुटखा, खर्रा आणि सिगारेटचे व्यसन असलेले लोक आपली गरज पूर्ण करण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी या वस्तूंची अवैध विक्री करणारे लोक ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ देत आहेत. या वस्तूंची दुप्पट, तिप्पट किमतीने विक्री होत असताना ग्राहकांची गर्दी या विक्रेत्यांकडे होत आहे. लॉकडाऊनच्या कारणामुळे पानठेले आणि दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दारूची दुकाने लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच १८ मार्च रोजी बंद करण्यात आली होती. दुकाने बंद होण्याची माहिती मिळताच शौकिनांनी दारू दुकानासमोर रांग लावून गरजेनुसार दारूचा स्टॉक खरेदी केला होता. अनेक दारूविक्रेत्यांनीही क्षमतेनुसार मालाचा स्टॉक करून ठेवला आहे.जिल्ह्यातील दकाने आणि बार बंद करण्याच्या दोन तीन दिवसांनंतर महसूल विभागाने ती सील केली होती. सुरुवातीला राज्य शासनातर्फे ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यानुसारच दारूविक्रेते आणि शौकिनांनीही स्टॉक करून ठेवला होता. नंतर मात्र लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले. मात्र परिस्थिती बघता संपूर्ण एप्रिल महिन्यापर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बहुतेक लोकांनी जमवून ठेवलेला स्टॉक आता संपलेला आहे. ज्यांच्याकडून नियमित माल घेते होते त्यांनीही हात वर केले आहेत. त्यामुळे पिणाऱ्यांची अडचण होत आहे. अशावेळी काळाबाजार करणाऱ्या आणि दारूच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात लोक ओढले जात आहेत. एकीकडे अवैध विक्रेते तिप्पट किमत घेऊन दारू देत आहेत तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लुटत आहेत. काही दिवसांपूर्वी वाठोडा पोलिसांनी दारूची आॅनलाईन होम डिलिव्हरी करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला होता. मात्र सायबर गुन्हेगार वेगवेगळ्याबारच्या नावाने ग्राहकांना लुटण्याचे काम करीतच आहेत. हीच स्थिती खर्रा, गुटखा, सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांचीही आहे. नागपुरी खर्रा देशभरात प्रसिद्ध आहे. हेच व्यसन कॅन्सर रुग्णांची संख्या वाढण्याचेही कारण ठरले आहे. शहराच्या लोकसंख्येचा मोठा भाग खºर्याच्या व्यसनाच्या विळख्यात आहे. यात महिला आणि अल्पवयीन मुलांची संख्याही मोठी आहे. अशा ग्राहकांना पानठेला चालविणारे दुकानदार दुप्पट किमतीने घरून खºर्याची विक्री करीत आहेत. गुटखा, विडी व सिगारेटसाठी तिप्पट किंमत वसूल केली जात आहे. काही पानठेला चालकांनी पोलिसांपासून बचावासाठी भाजीचे दुकान सुरू केले आहे. त्याआड खर्रा, सिगारेटची विक्री केली जात आहे. पानठेलाचालक व दुकानदार ब्रॅन्डेड पानमसाल्याच्या विक्रीतून सर्वाधिक नफा कमावत आहेत. ब्रॅन्डेड पानमसाल्याचा शौक करणारा विशेष ग्राहक असतो ज्यांच्यासाठी किंमत महत्त्वाची नसते. इतवारीतील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून गुटखा सुरक्षित स्थळी हलविला आहे.सुपारी व्यापाऱ्यांची चांदीखºर्यासाठी विशेष सुपारीची आवश्यकता असते. ही सुपारी ३०० ते ३२५ रुपये किलो भावाने विकली जायची. खºर्याची वाढती मागणी आणि होणारा काळाबाजार पाहता हीच सुपारी ५०० ते ५५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. इतवारीच्या अनेक व्यापाऱ्यांची सुपारी विक्रीतून चांदी होत आहे. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री बंधनमुक्त ठेवली आहे. त्याच्या आड सुपारी विक्री जोरात सुरू आहे. डिमांड पूर्ण करण्यासाठी रायपूरहून भाजी व धान्याच्या गाडीमधून सुपारी शहरात आणली जात असल्याची माहिती आहे.