लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दारूची होम डिलिव्हरी बिनदिक्कत सुरू ठेवण्यासाठी १० हजाराची लाच मागणाऱ्या नागपूर ग्रामीणच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला (एएसआय) एसीबीने जेरबंद केले. जयप्रकाश शिवनारायण शर्मा (वय ५२) असे त्याचे नाव आहे.
शर्मा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असून, त्याच्याकडे कळमेश्वर बीट आहे. कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या बीअर बारच्या संचालकासोबत शर्माने काही दिवसापूर्वी संपर्क केला.‘तुम्ही दारूची होम डिलिव्हरी देता. आम्ही १० ते ११ वाजताच्या दरम्यान वेगवेगळ्या कारणावरून तुमच्यावर केस करू शकतो. त्याचा तुम्हाला त्रास होईल. हे टाळण्यासाठी महिन्याला ६ हजार रुपये लाच (हप्ता) द्यावी लागेल’, असे शर्मा म्हणाला. या महिन्याचे ६ आणि गेल्या महिन्याचे ६ असे १२ हजार रुपये द्या. अन्यथा कारवाईस तयार राहा, असे शर्माने बार मालकाला बजावले होते. शर्माने १० हजारावर लाचेची तडजोड मान्य केली. हप्ता द्यायची इच्छा नसल्याने बारमालकाने एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे दोन दिवसापूर्वी तक्रार नोंदविली. शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाचेचे १० हजार रुपये घेण्यासाठी बार मालकाने शर्माला फोन केला. त्याने मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास काटोल मार्गावरील फेटरी येथील हनुमान मंदिराजवळ बोलविले. त्यानुसार बारमालक आणि एसीबीचे पथक तेथे पोहचले. लाचेची रक्कम स्वीकारताच नजर ठेवून असलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शर्माला जेरबंद केले. एसीबीने पकडल्यानंतर शर्माने निसटून जाण्यासाठी बराच खटाटोप केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. शर्माविरुद्ध कळमेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर शर्माच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात काय हाती लागले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
-----
‘ते’ १५ हजार कुणाचे?
लाच घेताना पकडल्यानंतर शर्माची एसीबीच्या पथकाने अंगझडती घेतली. यावेळी शर्माकडे १५ हजार रुपये आढळले. ते शर्माने कुठून आणले, त्याचीही एसीबी चाैकशी करीत आहेत. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप जगताप, अनामिका मिर्झापुरे, हवालदार प्रवीण पडोळे, पंकज घोडके, सारंग बालपांडे, सदानंद शिरसाठ, अमोल भक्ते आदींनी या कारवाईत सहभाग नोंदविला.
---