अनिल आदमने : गुन्हा दाखल करण्याचा इशारानागपूर : होमगार्डमध्ये समादेशक असताना डी. जी. गोखे, जितेंद्र कापसे, श्रीधर निमकर या होमगार्ड सैनिकांनी गैरव्यवहार केल्यामुळे चौकशी करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. यामुळे चिडून जाऊन त्यांनी आपली बदनामी केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती होमगार्डचे माजी समादेशक अनिल आदमने यांनी पत्रकार परिषदेत दिली.माजी समादेशक अनिल आदमने म्हणाले, पोलीस खात्यात भरती होण्यासाठी होमगार्ड सैनिकांची ३० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. डी. जी. गोखे यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज दिला तेव्हा त्यांची उपस्थिती केवळ २५ परेडची होती. परंतु प्रसार माध्यमात ५२ परेडला उपस्थिती असल्याचे दाखवून डी. जी. गोखे यांनी प्रमाणपत्र दिले नसल्याबाबत आपली बदनामी केली. जितेंद्र कापसे याने होमगार्ड सैनिकांवर दडपण आणून खोट्या तक्रारी केल्या. आपल्या कार्यकाळाच्या आधीही त्याच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई झाली होती तर श्रीधर निमकर याने हजेरी लावण्यासाठी होमगार्ड सैनिकांकडून पैसे घेतल्याची बाब उघड झाल्यामुळे चौकशी करून त्याची सेवा समाप्त करण्यात आली. सेवा समाप्त केल्यामुळे या तिघांनी सूडबुद्धीने आपल्यावर आरोप लावल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे आदमने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला द्वितीय होमगार्ड समादेशक डॉ. आनंद गजभिये, कंपनी कमांडर टीकाराम पाटील, वरिष्ठ पलटन नायक दीपक घाटे, कंपनी कमांडर रेखा डंबारे, सुनील ठाणेकर, कुंदन रंगारकर, रवींद्र बोद्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
होमगार्ड सैनिकांनी सूडबुद्धीने बदनामी केली
By admin | Published: July 19, 2015 3:15 AM