नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बुधवारी रात्री १० वाजता नागपुरात आगमन होणार आहे. २७ एप्रिल रोजी ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था राहणार आहे.
२७ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता जामठा येथे कार्यक्रम होणार असून त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्री विशेष विमानाने बुधवारी रात्री १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. रात्री त्यांचा नागपुरात मुक्काम असेल व गुरुवारी ते कार्यक्रमात सहभागी होतील. गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजता ते नागपुरातून प्रयाण करतील. जामठा येथील कार्यक्रमासोबतच ते संरक्षण क्षेत्राशी निगडित संस्था तसेच कोराडी येथेदेखील भेट देण्याची शक्यता आहे.
‘एनसीआय’च्या कार्यक्रमात ते सरसंघचालकांसोबत राहणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष तेथे राहणार आहे. अमित शाह यांचा दौरा लक्षात घेता नागपुरात २६ व २७ एप्रिल रोजी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली असून दोन हजार कर्मचारी-अधिकारी कर्तव्यावर राहणार आहेत. गृहमंत्र्यांच्या मार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी विशेष बंदोबस्त राहणार आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीतदेखील काही बदल करण्यात आले आहेत. २७ एप्रिल रोजी ते जामठा येथे जाणार असल्याने त्या मार्गावर आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांनी दिली.