नागपूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन तथागत गाैतम बुद्ध व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली.
गृहमंत्री अमित शाह सकाळी १०.५० वाजता दीक्षाभूमीवर पाेहोचले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित हाेते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले, सदस्य डॉ. राजेंद्र गवई, प्रा. डी.जे. दाभाडे, प्रा. प्रदीप आगलावे, एन. आर. सुटे, विलास गजघाटे, ॲड. आनंद फुलझेले आदींनी शाह आणि फडणवीस यांचे स्वागत केले. त्यांनी तथागत बुद्ध व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत मध्यवर्ती स्मारकाची परिक्रमा केली व पुष्ण अर्पण करून अभिवादन केले. यादरम्यान भंते नागदीपंकर यांच्याद्वारे बुद्ध वंदना घेण्यात आली. यादरम्यान अमित शाह यांनी दीक्षाभूमीच्या व्हिजिट बुकवर मनाेगतही व्यक्त केले. ‘दीक्षाभूमीवर दुसऱ्यांदा येण्याची संधी मिळाली. डाॅ. बाबासाहेब यांचे हे स्मृती स्थान केवळ भारतच नाही तर जगभरातील दलित, शाेषितांचे प्रेरणास्थळ आहे. बाबासाहेबांनी संविधानात लाेकशाहीचे मूळ सिद्धांत समाविष्ट करून आपले संविधान अद्वितीय बनविले आहे. मी अशा महापुरुषाला अभिवादन करताे,’ असा संदेश त्यांनी लिहिला. यावेळी स्मारक समितीतर्फे अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांना सन्मानचिन्ह, शाल आणि ‘बुद्ध ॲण्ड हिज धम्म’ हे पुस्तक प्रदान करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.
यानंतर अमित शाह यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक डाॅ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गाेळवलकर गुरुजी यांच्या समाधींचे दर्शन घेऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मोहन मते, आ. प्रवीण दटके उपस्थित होते.