गृहमंत्री अनिल देशमुख काँग्रेसवर नाराज, आघाडीचा धर्म पाळला नसल्याची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 05:19 AM2020-01-19T05:19:17+5:302020-01-19T05:19:40+5:30
काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, अशी खंत व्यक्त करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषेदत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.
नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून लढले. काँग्रेस बहुमतात आल्यामुळे आम्ही अध्यक्षपद काँग्रेससाठी सोडले. पण आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, अशी खंत व्यक्त करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषेदत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी झाली. यात दोन्ही पदे काँग्रेसने आपल्याकडेच ठेवली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे स्वर उमटू लागले आहेत. देशमुख म्हणाले की, निवडणूकपूर्व आघाडी झालेली असल्याने काँग्रेसकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्ष येणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसने तसे न करता ही दोन्ही महत्त्वाची पदे काँग्रेसने स्वत:च ठेवली. नागपूर जिल्हा परिषदेचे परिणाम हे केवळ नागपूरपुरतेच मर्यादित नाहीत. हे परिणाम दिल्लीपर्यंत जाऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले.
ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी ही निवडणूक सोबत लढविली. जागा वाटपसुद्धा ठरवूनच केले होते. त्यामुळे काँग्रेसने सत्तेत योग्य तो वाटा देणे अपेक्षित होते, तसे झाले नाही. सत्ता स्थापनेबाबत काही महत्त्वपूर्ण बैठका झाल्या, यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, मी स्वत: उपस्थित होते.
काँग्रेसतर्फे निरीक्षक माणिकराव ठाकरे, मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे यांनी चर्चा केली. पटेल यांनी काँग्रेसपुढे दोन प्रस्ताव ठेवले. यात पहिल्या प्रस्तावानुसार राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद मिळणे अपेक्षित होते.
‘राष्ट्रवादीला योग्य वाटा देईल’
दुसऱ्या प्रस्तावानुसार सभापतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे एक खुले आणि एक महिला अशी दोन सभापती पदांची मागणी करण्यात आली. मात्र काँग्रेसने पहिला प्रस्ताव अमान्य केला. राष्ट्रवादीतर्फे चंद्रशेखर कोल्हे आणि दिनेश बंग यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज सादर केले होते. मात्र त्यानंतर झालेल्या चर्चेतून आम्ही दोन्ही अर्ज मागे घेतले. आता सभापतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला योग्य तो वाटा देईल, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.