लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुका या सहा महिन्यांवर गेल्या, या भ्रमात कुणी राहू नका. निवडणुका या दोन महिन्यातच होतील, त्यामुळे सर्वांनी सज्ज राहा, कामाला लागा, असे राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे संपर्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे सांगितले. तसेच सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, असेही स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक रविवारी एमटीडीसीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. प्रफुल्ल पटेल, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री सुबोध माेहिते, निरीक्षक राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी वळसे पाटील यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते म्हणाले, निवडणूक सहा महिन्यांवर गेली या भ्रमात राहू नका, दोन महिन्यातच निवडणूक होणार असून तयारीला लागा. मेरिट बेसिसवर उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट करीत प्रभागांची जबाबदारी घेण्याची सूचनाही केली.
बैठकीला माजी आमदार प्रकाश गजभिये, शेखर सावरबांधे, दीनानाथ पडोळे, प्रवीण कुंटे पाटील, गंगाप्रसाद ग्वालबंशी, बजरंग सिंह परिहार, वेदप्रकाश आर्य, आभा पांडे, दिलीप पनकुले, प्रशांत पवार, वर्षा शामकुळे, जावेद हबीब, शैलेंद्र तिवारी, लक्ष्मी सावरकर, बाबा जुजर, श्रीकांत शिवणकर, राजाभाऊ टाकसाळे, अविनाश गोतमारे, जानबाजी मस्के प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
पक्षातील मंत्र्यांचे नागपूरला नियमित दौरे व्हावेत - प्रफुल्ल पटेल
याावेळी खा. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे जे मुंबईतील मंत्री आहेत, त्यांचे नागपुरात नियमितपणे दौरे करण्यात यावेत, असे सांगितले. तसेच सन्मानजनक जागा मिळाल्या तरच आघाडी करावी, यावर त्यांचा भर होता.