नागपूर : धार्मिक वादातूर राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात कुठेही अशांततेच वातावरण निर्माण होणार नाही, याबाबत आम्ही काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होत होत असेल तर ती कारवाईस पात्र ठरते आणि त्यासंबंधी कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात भोंग्याच राजकारण चांगलच तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना केंद्राकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाणार असल्याच्या प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले काही व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. या राज्यातील सर्व नागरिकांचं रक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. परंतु कोणाला सुरक्षा द्यायची हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, ते सुरक्षा देऊ शकतात, असे ते म्हणाले. यासोबतच राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये झेंड्यावरून झालेल्या हिंसाचारावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अमरावती परतवाडा. अचलपूर या भागात हिंसक घटना घडतात, याचा अर्थ तिथे समाजविघातक शक्ती सक्रिय आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. या घटनेतील दोषींवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, लवकरच या घटनेतील दोषी समोर येतील, असेही वळसे पाटील म्हणाले.
भाजपकडून देशातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरेदर केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी. मात्र, या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहे, असा आरोपही वळसे पाटील यांनी केला.