नागपूर : राज्याचे गृहमंत्री म्हणून नागपूरकर नेत्याला बघण्याची सवय जडलेल्या नागपूरकरांना तब्बल साडेसहा वर्षांनंतर नागपूरच्या बाहेरचे गृहमंत्री बघायला मिळणार आहेत. गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे-पाटील गुरुवारी रात्री नागपुरात दाखल झाले. शुक्रवारी स्थानिक आणि विदर्भातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते नागपूर-विदर्भातील गुन्हेगारीचा आढावा घेणार आहेत.
शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे आणि त्यानंतर आघाडी सरकारमध्ये दीड वर्ष गृहमंत्रीपद नागपूरनेच भूषविले. युती सरकारचे मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद पाचही वर्षे स्वत:कडेच ठेवले होते. सत्तांतरानंतर गृहमंत्रीपद अनिल देशमुख यांच्या रुपाने नागपूरच्याच वाट्याला आले. त्यामुळे सलग साडेसहा वर्षे नागपूरकरांना गृहमंत्री होमटाऊनचा अनुभवायला मिळाला.
गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर वळसे-पाटील शुक्रवारी पहिल्यांदाच नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नागपूर-विदर्भातील पोलीस दलासमोरची आव्हाने, समस्या आणि गुन्हेगारी यावर मंथन होणार आहे. गुरुवारी रात्री विमानतळावर वळसे पाटील यांचे आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार, वर्षा शामकुळे, शेखर सावरबांधे आदींनी त्यांचे स्वागत केले.