लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोनाचा धाेका लक्षात घेऊन प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपाययोजनासोबतच काही निर्बंध लागू केले आहेत. ज्या कोरोनाबाधित रुग्णांना होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन केले आहे त्या रुग्णांनी घराबाहेर निघू नये, क्वारंटाईन नियमाचे पालन करावे, यासाठी संबंधित झोन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना संबंधिताच्या डाव्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्याचे आदेश दिले आहेत.
अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याला बंदी घालण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर बंधनकारक करण्यात आले आहे. इमारत फ्लॅट स्कीम, हाउसिंग सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यास तसेच एखाद्या रस्त्यावर २० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यास असा रस्ता किंवा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जाणार आहे. मनपा आयुक्तांनी या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्याचे अधिकार मनपाचे उपद्रव शोध पथक, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी झोनचे सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
‘मायक्रोकंटेनमेंट झोन’ तयार करणार
- प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेला ‘हॉटस्पॉट’ भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन ‘हॉटस्पॉट झोन’मधील इमारती, गल्ली, वस्तीनिहाय ‘मायक्रोकंटेनमेंट झोन’ तयार करून तेथे सक्तीने उपाययोजना राबविण्यात येतील. शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून नमुना तपासणी करण्यात येणार आहे. ‘कोरोना’संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दररोज विभागीय आयुक्त आढावा घेणार आहेत.
हे आहेत शहरातील हॉटस्पॉट्स
जरीपटका, जाफरनगर, फ्रेण्डस् कॉलनी, न्यू बीडीपेठ, स्वावलंबीनगर, खामला सिंधी कॉलनी, दिघोरी, वाठोडा, लक्ष्मीनगर, अयोध्यानगर
होम क्वॉरंटाईन रुग्ण बाहेर आढळल्यास गुन्हा
-ज्या ठिकाणी पाच रुग्ण आहेत, तेथे संपूर्ण इमारत, वीसपेक्षा जास्त रुग्ण आहेत त्या ठिकाणी संपूर्ण परिसर सिल करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनमध्ये रुग्ण बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.