लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीअर, रमसह विलायती मद्याची घरून विक्री करणाऱ्या गोधनीतील एका बार मालकाला आणि त्याच्या मेव्हण्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून बिअर, रम आणि व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. रविवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.ईश्वर गोपाळराव कोलते (वय ६३, रा. गोधनी मार्ग, मानकापूर) आणि नीरज यशवंत कापसे (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत. ईश्वर कोलतेचा मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राधे बीअर बार आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सर्व बीयर बार, वाईन शॉपला टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे बिअर बारच्या संचालकांनी आपल्या साथीदारांना हाताशी धरून बारमधील दारू बाहेर काढून ती पाच ते सात पट जास्त दराने विकणे सुरू केले आहे. नागपुरातील मेयो चौकातील मदिरा बीअर बार आणि हुडकेश्वर मधील एस. के. बीअर बार मालकांची ही बनवेगिरी उघड झाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापे घालून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त केला आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अशाच प्रकारे मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राधे बीअर बारचा मालक ईश्वर कोलते आणि त्याचा मेहुणा नीरज कापसे हे दोघे त्यांच्या गोधनी मार्गावरील घरातून मद्याची अवैध विक्री करत असल्याचे गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कळले. त्यानुसार रविवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांनी कोलतेच्या घरी छापा मारला. पोलिसांनी तेथून बकार्डी ब्लॅक रम, टूबर्ग बियर, इंपिरियल ब्लू तसेच रॉयल चॅलेंज विस्कीच्या बाटल्या जप्त केल्या. आरोपी कोलते आणि कापसे या दोघांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त निलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक निरीक्षक प्रशांत घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात बीअर, व्हिस्कीची घरून विक्री : बारमालकासह दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 8:40 PM
बीअर, रमसह विलायती मद्याची घरून विक्री करणाऱ्या गोधनीतील एका बार मालकाला आणि त्याच्या मेव्हण्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून बिअर, रम आणि व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई