नागपूर : पश्चिम नागपुरातील अनेक वस्त्यांना डेंग्यू, मलेरियाने विळखा घातला आहे. या आजारांचा बंदाेबस्त करण्यासाठी स्थानिक तरुणांनीच पुढाकार घेत घराेघरी जाऊन फवारणी सुरू केली आहे. गेल्या दहा-बारा दिवसात या तरुणांनी १००० पेक्षा अधिक घरी फवारणी केली.
सुरेंद्रगड, मानवसेवा नगर व गौरखेडे काॅम्प्लेक्स आदी वस्त्यांमध्ये प्रत्येक पाचव्या घरी डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी कचऱ्याच्या डंपिंगमुळे घाण पसरली आहे. सिवेज लाईनचे उघडे चेंबर, अपू्र्ण नालेसफाई, मोकळ्या भूखंडावर साचलेले डबके व झुडुपांमुळे संपूर्ण परिसर डेंग्यू व मलेरियाच्या डासांसाठी पोषक ठरला आहे. महानगरपालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या आराेपानुसार मनपाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण केले नाही. केवळ औपचारिकता म्हणून आठ-दहा घरांची पाहणी करण्यात आली. सुरेंद्रगडचा मोठा भाग हा झोपडपट्टीचा आहे. अरुंद व दाटीवाटीच्या ठिकाणी लोक रहातात. याठिकाणी मनपाचे कर्मचारी अजूनही पोहोचले नाहीत. शिवाय कुठल्याही प्रकारची औषध फवारणी किंवा फाॅगिंग होतांना दिसत नाही. त्यामुळे जनहित या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी स्वत:च औषधांची फवारणी चालविली आहे. घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत. यामध्ये जनहितचे संयोजक अभिजीत झा, प्रवीण बैरागी, राहुल उइके, अरुण बैरागी, अमित डागोर, राकेश तिवारी, राहुल बैरागी, राहुल दुबे, रोहित मिश्रा, मुकेश विश्वकर्मा, चंद्रकांत हेडाऊ, भरत दुबे आदींचा सहभाग आहे.