लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संकटात सामान्य नागरिक सुरक्षित राहावे म्हणून रस्त्यावर राहून शहरातील परिस्थिती नियंत्रित करण्याचे काम पोलीस करीत आहेत. असंख्य पोलीस शहरातील रेड झोन परिसरातही तैनात आहेत. यात राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) जवानांचाही समावेश आहे. या जवानांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषध देण्यात आले. कोरोना महामारीतून सुटका करण्यासाठी अद्याप तरी औषध शोधणे शक्य झाले नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शारीरिक अंतर पाळणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, हे पर्याय उपलब्ध आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा उपाय महत्त्वाचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केले आहे. ही बाब लक्षात घेत कर्तव्यावर असलेल्या एसआरपीएफ जवानांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी औषधांचा पुरवठा करण्यात आला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे समादेशक जी. श्रीधर, एसआरपीएफ गट क्र. १३ चे समादेशक निखिल पिंगळे, गट १५ चे समादेशक जावेद अनवर यांच्या पुढाकाराने व होमिओपॅथी समुपदेशन केंद्र मानेवाडाचे वैद्यकीय अधिकारी आशिष मानापुरे, वैशाली मानापुरे यांच्या मार्गदर्शनात २,०४० जवानांना हे औषध देण्यात आले. कर्तव्यावरील जवानांच्या हितासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे व कर्मचारी संजय वानखेडे, एसआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र इंगोले, रामेश्वर कोकुर्डे, आनंद झाडे यांनी प्रयत्न केले.
नागपुरात एसआरपीएफ जवानांना होमिओपॅथी औषध वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 8:26 PM