नागपूर : होमिओपॅथी डॉक्टरची ४ कोटी ३५ लाखांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसेविरोधात नागपूर पोलिसांनी गुरुवारीदेखील कारवाई केली. पारसेच्या लक्झरी कार व महागड्या मोटारबाईक्स जप्त करण्यात आल्या. याशिवाय शहर व परिसरात कुठे कुठे मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या, याचा शोध सुरू आहे.
बडकस चौकातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. राजेश मुरकुटे यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. पंतप्रधान कार्यालयात ओळख असल्याचा दावा करत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पारसे प्रकृती अस्वास्थ्यामुळे वर्धा मार्गाजवळील एका रुग्णालयात आयसीयूत दाखल आहे. त्यामुळे पोलिसांना चौकशी करता आली नाही.
होमिओपॅथी डॉक्टरची साडेचार कोटींनी फसवणूक; सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेविरुद्ध गुन्हा
गुरुवारी पोलिसांनी स्वावलंबीनगर येथील त्याच्या घरातून कार व बाईक्स जप्त केल्या. पारसेने फसवणुकीच्या रकमेतून मालमत्ताही खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या दिशेनेदेखील तपास सुरू आहे.
चौकशीसाठी प्रतीक्षा
दरम्यान, पारसे काही महिन्यांपासून लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहे. या आठवड्यातच वर्धा मार्गाजवळील एका रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीचे कारण असल्याने पोलीस चौकशीसाठी प्रतीक्षा करत आहेत. चौकशीनंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
लॅपटॉपची सखोल तपासणी सुरू
शहरातील आणखी काही लोक फसवणुकीचे बळी ठरले असल्याचा पोलीस सूत्रांचा दावा आहे. त्यातील बहुतांशजण 'हनी ट्रॅप'च्या तावडीत अडकले आहेत. ही तक्रार देण्यास ते टाळाटाळ करत आहेत. बदनामीच्या भीतीपोटी लोक तक्रार करण्यासाठी समोर आलेच नाहीत. पोलिसांनी जप्त केलेल्या लॅपटॉप व इतर बाबींचीदेखील सखोल तपासणी सुरू आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका नामांकित डॉक्टरने यासंदर्भात त्याची आपबिती काहीजणांना सांगितली आहे. तसेच एका ड्रायव्हिंग स्कूल चालकालादेखील जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात लवकरच गुन्हा दाखल होऊ शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"