शिक्षिकेसह पाच महिलांनी केली तक्रार नागपूर : घरबसल्या पदवी उपलब्ध करून देण्याच्या नावावर अनेकांना फसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गिट्टीखदान परिसरात उघडकीस आली. गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत एक खासगी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेची प्रमुख एक महिला आहे. या संस्थेतर्फे घरबसल्या पदवी मिळवून देण्याचा दावा केला जातो. घरबसल्या पदवी मिळविण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे पदवीसाठी इच्छुक लोक या संस्थेला सहजपणे मिळतात. ताज्या प्रकरणात एका शिक्षिकेसह पाच महिलांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ता महिला शिक्षिका असून एका खासगी शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी ६ एप्रिल रोजी बीएड पदवीसाठी प्रवेश घेतला होता. त्यांच्याकडून नावनोंदणीच्या नावावर १० हजार रुपये घेण्यात आले. ते दिल्यानंतर ५० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. एकाचवेळी ५० हजार रुपये देणे शक्य नसल्याचे शिक्षिकेने सांगितले. तेव्हा विद्यापीठ नियमांचा हवाला देण्यात आला. खूप दबावानंतर शिक्षिकेने ६ जून रोजी ५० हजार रुपये जमा केले. तेव्हापासून त्या परीक्षेची प्रतीक्षा करू लागल्या. संस्थेच्या संचालिकेने जुलैच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होईल, असे आश्वासन दिले. संस्थेच्या प्रमुख असलेल्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार त्यांची संस्था उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठाशी संलग्न असून त्यांच्या माध्यमातून पदवी दिली जात असल्याचे सांगितले होते. दरम्यान शिक्षिकेने उत्तर प्रदेशातील त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर संस्थेच्या प्रमुखाने दिलेली माहिती तपासून पाहिली. तेव्हा १६ जून रोजीच शेवटचा पेपर झाल्याचे लक्षात आले. तेव्हा शिक्षिकेने संस्थेत जाऊन पूर्ण शुल्क भरल्यानंतरही परीक्षा घेण्यात न आल्याचे कारण विचारले. तेव्हा डिसेंबरमध्ये परीक्षा देण्यास सांगितले. समोरची व्यक्ती खोटे बोलत असल्याचे लक्षात येताच शिक्षिकेने जाब विचारला असता त्यांच्याशी अभद्र व्यवहार करण्यात आला. यामुळे त्या शिक्षिकेला चांगलाच धक्का बसला. या घटनेमुळे त्यांनी प्रवेश घेणाऱ्या इतर महिलांशी संपर्क साधला. त्यांना सुद्धा असाच अनुभव आल्याचे सांगण्यात आले. यानंतर शिक्षिकेसह त्या पाचही महिलांनी शिवसेना उपविभागप्रमुख बबलू पटेल यांच्या मदतीने १ जुलै रोजी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. गिट्टीखदानचे ठाणेदार आर.डी. निकम यांनी सांगितले की, तक्रारीची चौकशी केली जाईल. त्यात काही तथ्य आढळून आल्यास पुढची कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)५० हजारात पदवीसंस्थेतर्फे बीए, एमए, बीएड या पदव्यांसाठी ५० ते ६० हजार रुपये घेतले जातात. तर एमबीए, हॉटेल मॅनेजमेंटसाठी दोन लाख रुपये घेतले जातात. एका तक्रारकर्त्याला मिळालेली गुणपत्रिका बोगस असल्याचा संशय आहे. या गुणपत्रिकेवर विद्यापीठ कुलसचिवाची स्वाक्षरी सुद्धा नाही. एका पीडिताने संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेवरही प्रश्न उपस्थित करीत सांगितले की, त्यांना एकच पेपर दोन वेळा देण्यात आला होता.
घरबसल्या पदवी,अनेकांना फसवले
By admin | Published: July 07, 2016 3:01 AM