नागपूर : अश्लील गाणी गाऊन ती यु ट्यूबवर अपलोड केल्याचा आरोप असलेला लोकप्रिय रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला सत्रन्यायालयाने शुक्रवारी जोरदार दणका दिला. हनीसिंगने आवाजाचे नमुने देण्याकरिता उद्याच (शनिवारी) पाचपावली पोलीस ठाण्यात हजर व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिला.
यापूर्वी गेल्या २७ जानेवारी रोजी न्यायालयाने आवाजाचे नमुने देण्याकरिता ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश हनीसिंगला दिला होता. परंतु, हनीसिंगने त्या आदेशाचे पालन केले नाही. दरम्यान, त्याने सत्रन्यायालयात अर्ज दाखल करून या आदेशात बदल करण्याची विनंती केली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, त्याचा हा अर्ज फेटाळून लावला व उद्याच पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिला. अर्जावर न्या. ए. सी. राऊत यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सरकारच्यावतीने ॲड. अर्चना नायर यांनी कामकाज पाहिले.
उच्च न्यायालयाच्या आदेशावरून एफआयआर
व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी, हनीसिंगविरुद्ध एफआयआर नोंदविला जावा, याकरिता सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, पण त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी कनिष्ठ फौजदारी न्यायालयात अर्ज दाखल केले. ते अर्ज खारीज झाले. परिणामी, त्यांनी ॲड. रसपालसिंग रेणू यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून हनीसिंगविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला. त्यानुसार, पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणात सत्रन्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे तो कारागृहाबाहेर आहे.