सत्र न्यायालय : देशाबाहेर जाण्यास मनाईनागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगला सत्र न्यायालयाने सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हनीसिंगच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत असल्याचे जब्बल यांचे म्हणणे आहे. पाचपावली पोलीस तक्रार नोंदविल्यापासून हनीसिंगला अटक करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी पोलिसांचे पथक दिल्ली व मुंबईला गेले होते. परंतु, त्यांना हनीसिंग सापडला नाही. दरम्यान, हनीसिंगने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांनी अर्जातील विविध बाबी लक्षात घेता हनीसिंगला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, पोलिसांना आवश्यक तेव्हा तपासाकरिता उपस्थित राहावे यासह विविध अटी हनीसिंगपुढे ठेवण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)हायकोर्टात याचिका प्रलंबितजब्बल यांच्या तक्रारीवर पाचपावली पोलिसांनी सुरुवातीला सहा महिन्यांपर्यंत काहीच कारवाई केली नव्हती. यामुळे त्यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. पोलीस आयुक्तांनीही समाधानकारक कारवाई केली नाही. यानंतर त्यांनी जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जेएमएफसी न्यायालयाने पोलिसांचा तपास सुरू असल्याने प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन तक्रार अर्ज खारीज केला होता. परिणामी त्यांनी अॅड. रसपालसिंग रेणू यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी हनीसिंगविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.
हनीसिंगला तात्पुरता अटकपूर्व जामीन
By admin | Published: December 26, 2014 12:54 AM