नागपूर : बुटीबोरीत हत्या करून वेणा नदीत फेकण्यात आलेल्या महिला-पुरुषाच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध २४ तासांत लावण्यात पोलिसांना यश आले आहे. स्वत:ची पत्नी सोडून अगोदरच लग्न झालेल्या दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या भावामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून सख्ख्या भावांनीच त्याचा काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली. शेतीच्या कारणावरून अगोदरच भावांमध्ये वाद सुरू होता व त्यातच बदनामीमुळे आगीत तेल ओतल्या गेले.
उत्तम सुरेश बोडखे (३१ वर्षे, बिहाडी, ता. कारंजा घाडगे) आणि सविता गोवर्धन परमार (३८ वर्षे, सोनेगाव मुस्तफा) अशी मृतांची नावे आहेत. आरोपींमध्ये उत्तमचा भाऊ राहुल सुरेश बोडखे (२७), खुशाल सुरेश बोडखे (२९), विजय वसंतराव बोडखे (३०, तिघेही बिहाडी) आणि आकाश अशोक राऊत (२४, कारंजा घाडगे) यांचा समावेश आहे.
वेणा नदीच्या पुलाखाली गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उत्तम आणि सविता यांचे मृतदेह आढळून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बुटीबोरी पोलिसांसह जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने (एलसीबी) तपास सुरू केला. एकूण पाच पथके तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यात आले. मृतांचे फोटो सोशल मीडिया आणि माहितीच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले. त्यामुळे मृतांची ओळख पटण्यास मदत झाली.
अटक आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, बुरीबोरीचे एसएचओ भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एपीआय अनिल राऊत, राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी भावांचे जमत नव्हते लग्न
सविता परमार विवाहित असून, तिला दोन मुले होती. मात्र, ती पतीपासून वेगळी राहू लागली. उत्तमचेही लग्न झाले होते आणि तोही आपल्या पत्नीला सोडून गेला होता. उत्तम आणि सविता हे बांधकाम कामगार म्हणून काम करत होते आणि बरेच दिवस इसासनी (ता. हिंगणा) येथील भीमनगर झोपडपट्टीत एकत्र राहत होते. त्यामुळे गावात कुटुंबाची बदनामी झाल्याने दोन्ही भाऊ उत्तमवर रागावले होते. सवितापासून दूर होण्याबाबत ते वारंवार उत्तमला सांगत होते.
दोघाही भावांचे लग्नदेखील जमत नव्हते. याशिवाय शेतीच्या वाटणीवरूनदेखील वाद सुरू होता. त्यामुळे दोन्ही भावांनी उत्तमचा काटा काढण्याचे ठरविले होते.
अशी केली हत्या
शेतीचा वाद मिटविण्यासाठी दोन्ही भावांनी उत्तमला ६ जुलै रोजी बिहाडी येथे येण्यास सांगितले. त्याच दिवशी आरोपींनी उत्तमला बाजारगाव येथे गाठले. सोबत आणलेल्या वाहनातच त्यांनी दोघांची हत्या केली. त्यानंतर बुटीबोरी येथे वेणा नदीच्या पुलावर आले व दोघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिले.