लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कदम से कदम आज तू, मिला रही है हर मर्द से, आँख मिलाती है तू, हर दर्द से, तुम्ही से आज तुम्ही से कल है, हर मुश्किल का तेरे पासही हल है’ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली गद्रे यांनी वीरपत्नींचे मनोबल उंचावले. गद्रे शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाकरिता कार्य करतात.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) यांच्या पत्नी सुषमा यांचा जागतिक महिला दिवसानिमित्त विदर्भ महिला वकील संघटनेच्यावतीने शुक्रवारी शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी गद्रे यांनी ही कविता सादर केली. संघटनेच्या माजी अध्यक्षा अॅड. पल्लवी खरे, अध्यक्षा अॅड. पद्मा चांदेकर, सचिव रितू कालिया व्यासपीठावर उपस्थित होत्या. याप्रसंगी राजपूत यांची दोन मुले व दोन नातेवाईकांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात पार पडला.राजपूत यांनी २० वर्षे देशसेवा केली. त्यांनी आणखी सेवाकाळ वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाला शब्दांत व्यक्त केले जाऊ शकत नाही. शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच, आपण प्रत्येकाने या कुटुंबांचा मानसिक आधार झालो पाहिजे असे गद्रे यांनी पुढे बोलताना सांगितले.चांदेकर व खरे यांनीदेखील समयोजित विचार व्यक्त केले. याप्रसंगी हायकोर्ट बार असोसिएशन, कामगार न्यायालय वकील संघटना, ग्राहक वकील संघटना, अधिवक्ता परिषद, सहकार न्यायालय वकील संघटना, हायकोर्ट कर्मचारी आदींनीही सुषमा राजपूत यांचा सन्मान केला. जयश्री अलकरी यांनी संचालन केले तर, सुनिता चचोदिया यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सुषमा राजपूत गहिवरल्यासन्मानाला उत्तर देताना सुषमा राजपूत यांना गहिवरून आले. त्यामुळे त्यांना सावरावे लागले. पतीवर फार प्रेम होते. त्यांना आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्यावर गर्व आहे. त्यांना आणखी देशाची सेवा करायची होती. जीवनात कधीच घाबरायचे नाही असे ते नेहमीच म्हणत होते. त्यांचे हे शब्द जगण्याचे बळ देतात अशा भावना सुषमा राजपूत यांनी व्यक्त केल्या.