लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘लोकमत वूमेन अचिव्हर्स’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा मंगळवारी १२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते रंगणार आहे. रोकडे ज्वेलर्स, वाघमारे मसाले, ऑलिव्ह रिसाॅर्ट व विदर्भ मीडियाच्या सहयोगाने रंगणाऱ्या या सोहळ्यात या महिलांचा सत्कारही होणार आहे.
या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्या यावेळी सत्कारमूर्तींशी संवाद साधतील. पंखातील बळ, जबर महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्टाच्या जोरावर आज या महिलांनी यशोशिखर गाठले आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन हे अत्यंत जिकिरीचे काम असताना महिला ती जबाबदारी लीलया पेलतात. खाचखळग्यांनी पुरेपूर भरलेल्या अशा या वाटेवर त्यांनी स्वत:च स्वत:चा मार्ग प्रशस्त केला आहे. आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून, इतरांना अचंबित करणारी व प्रेरणा देणारीही आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास, यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाईल. त्यांच्याकडे पाहून अनेकींना नवी आशा दिसेल. त्यामुळेच तर त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अवघ्या जगासमोर आणण्यासाठीचा हा एक कौतुक सोहळा आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.
सत्कार सोहळा आणि कॉफी टेबल बुकमुळे आपल्या भागातील कर्तृत्ववान महिलांचे कार्य समाजापुढे येणार आहे. सर्वांगसुंदर असा हा सोहळा रंगणार आहे.
- राणी रोकडे, संचालिका - रोकडे ज्वेलर्स, नागपूर ()
महिला सन्मानाचा हा सोहळा दरवर्षी आम्ही बघतो आणि आवर्जून हजेरी लावतो. या सोहळ्यातून समाजापुढे येणाऱ्या महिला अनेक महिलांना प्रेरक ठरतात.
- प्रकाश वाघमारे, संचालक - वाघमारे मसाले, नागपूर ()
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे, हे कर्तव्य आहे आणि लोकमत हे कार्य सातत्याने करीत आहे. याच महिला इतर महिलांना मार्गदर्शक ठरणार आहेत.
- संध्या चौकसे, संचालिका - ऑलिव्ह रिसाॅर्ट (रामधाम आणि राजकमल टुरिझम) ()
एकविसाव्या शतकातही महिला मागेच राहत असल्याचा कांगावा होतो. काहीअंशी तो खरा आहे. मात्र, या सोहळ्यामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळत आहे.
- राजेश रंगारी, व्यवस्थापकीय संचालक - विदर्भ मीडिया ()
किशोरी शहाणे यांची विशेष उपस्थिती
प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे या सोहळ्याला विशेषत्वाने हजेरी लावणार आहे. यावेळी त्या सत्कारमूर्तींशी संवाद साधण्यासोबतच त्यांच्या कार्याची माहितीही जाणून घेतील. किशोरी शहाणे या मराठी व हिंदी चित्रपटांसोबतच अनेक टीव्ही मालिकांमधून घरोघरी पोहोचल्या आहेत. त्यांचाही जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक ठरलेला आहे.
...........