लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी सुरक्षेच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन वैयक्तिक आणि नऊ कर्मचाऱ्यांना सामूहिक पुरस्कार देऊन सन्मानित केले.मेल एक्स्प्रेसचे लोकोपायलट विनोद कुमार गुप्ता यांनी आपल्या रेल्वेगाडीचे परिचालन करण्याच्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावून एप्रिल २०१७ मध्ये २७ हजार ५९२ युनिट विजेची बचत केली. त्यांना एनर्जी स्टार पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सतर्कता बाळगून कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात १२ मे रोजी आमलाचे लोकोपायलट आय. बी. खान यांना बडनेरा-नरखेड सेक्शनमध्ये कामगिरी बजावताना आमला यार्डात लोकोत एअरब्रेक ट्रबल असल्याचे आढळले. त्यामुळे लोको ब्रेक रिलीज न होणे आणि बीपी प्रेशर तयार न झाल्यामुळे इंजिन बंद पडण्याच्या स्थितीत होते. त्यांनी त्वरित लोकोची पाहणी करून ते वाहतुकीसाठी दुरुस्त केले. १४ मे रोजी वर्धा येथील कनिष्ठ अभियंता राजू कुमार अयोध्या प्रसाद यांना कामगिरी बजावताना गुड्स ट्रेनमध्ये हॉट एक्सेल असल्याचे समजले. त्यांनी त्वरित त्याची सूचना गाडीच्या गार्डला आणि वर्ध्याच्या आरआरआय कॅबिनला दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळता येणे शक्य झाले. तर सामूहिक पुरस्कारात लोकोपायलट व्ही. ए. सायरे आणि सहायक लोकोपायलट राहुल काकडे यांना पुलगाव स्थानकावर निरीक्षणादरम्यान रेल्वेगाडी क्रमांक १८०३० चा पेन्टोहॉर्न तुटलेला आढळला; सोबतच मागून येणाऱ्या गाडी क्रमांक १२८१० ला कॉशन आॅर्डर दिली. गाडीच्या लोकोपायलटने किलोमीटर क्रमांक ७२९/३१ जवळ ओएचई तुटल्याचे समजताच त्याची माहिती त्वरित कंट्रोल रुमला दिली. त्यामुळे मोठे नुकसान टाळता आले. ११ मे रोजी लोकोपायलट जगदीश प्रसाद आर्या, सहायक लोकोपायलट गोवर्धन मोहतो यांनी पुलगाव-कवठा सेक्शनमध्ये ओएचई असेम्ब्लीचा आर्म तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी पेन्टो खाली घेऊन गाडीला सुरक्षितरीत्या काढले. तर लोकोपायलट शमीम अहमद, सहायक लोकोपायलट बलवंत सिंह यांना गाडीच्या इंजिनमधुन आॅईल गळती होत असल्याचे समजताच त्यांनी याची सूचना नियंत्रण कक्षाला दिल्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळता आली.या सर्व कर्मचाऱ्यांना सामूहिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कर्तव्यदक्ष रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव
By admin | Published: May 23, 2017 2:06 AM