लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवीगाळ केल्याने संतापलेल्या गुंडाने त्याच्याच मित्राचा खून केला. ही घटना नंदनवन येथील श्री नगर येथे घडली. तुषार सुरेश सिंह बैस ऊर्फ ठाकूर (२३) रा. व्यंकटेशनगर असे मृताचे नाव आहे तर आरोपीचे नाव आकाश ताराचंद गौंड (२५) रा.श्री नगर असे आहे. आकाशचा मित्र अरुण अवस्थी याच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे.
तुषार बैस हा सेल्समनचे काम करीत होता. आरोपी आकाश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याची मृत तुषार व अरुण अवस्थी याच्याशी मैत्री आहे. अरुणची कामाक्षी नावाच्या विद्यार्थिनीशी मैत्री आहे. कामाक्षीने हन्नी मेश्राम याच्यासोबत व्यंकटेशनगरात एक फ्लॅट भाड्यावर घेतला होता. येथे मंगळवारी रात्री तुषार, आकाश, अरुण, कामाक्षी, आणि हन्नी हे दारू पार्टी करीत होते. पहाटे ३ वाजे दरम्यान आकाशने अरुणला बैलबुद्धी म्हटले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. ते भांडत तुषारसह फ्लॅटच्या खाली आले. तिथेही भांडण करू लागले. अरुणने ‘तुझ्या घरी जाऊन चर्चा करू’ असे म्हणत आकाशला घरी जाण्यास सांगितले. आकाश आपल्या घरी आला त्याच्याच मागे तुषार आणि अरुणही पोहोचले. अरुण एमबीएचा विद्यार्थी आहे. तो आयटी कंपनीत काम करतो. तुषार अरुणची बाजू घेत आकाशला शिवीगाळ करू लागला. तुषार शिवीगाळ करीत असल्याने आकाशच्या कुटुंबीयांनी त्याला फटकारले. आकाश घरून चाकू घेऊन आला. त्याने तुषारच्या छातीवर वार करून त्याला जखमी केले. काही वेळानंतर दोघेही तुषारला बाईकवर बसवून मेडिकलला घेऊन गेले. तिथे अनोळखी व्यक्तीच्या हल्ल्यात जखमी असल्याचे सांगून भरती केले. उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला. तुषारच्या खुनाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक चार सक्रिय झाले. त्यांनी आकाश व अरुणला विचारपूस केली. तेव्हा आकाशने गुन्ह्याची कबुली दिली. आकाशच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल आहे. अरुण अवस्थीच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे. कामाक्षी व हन्नी यांनी मात्र त्यांना काहीही माहीत नसल्याचे सांगितले. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात एपीआय ओम सोनटक्के व त्यांच्या चमूने केली.