नागपूर : भर रस्त्यावर गुंडागर्दी करत एक व्यापारी व त्याच्या नोकराला धमकी देत तलवारीच्या धाकावर मोबाईल लुटण्यात आला. पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुमित श्रीचंद वासवानी (२२, जरीपटका) याचे इंदोरा चौकात मोबाईलचे दुकान आहे. ते पायी चहा आणण्यासाठी गेले असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी ‘रॉंग साईड चालायला तुझ्या बापाचा रोड आहे का’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर ते सुमितच्या दुकानासमोर गेले व आज दुकानच फोडतो असे म्हणत गोंधळ घालू लागले. एकाने तलवार काढत धमकी देण्यास सुरुवात केली. सुमितच्या दुकानात काम करणारा हलीम अन्सारी याने मोबाईलवरून पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याचा फोन हिसकावून पळ काढला. सुमितच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला व शोधमोहीम सुरू केली. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून आरोपी क्षितीज अनिल चौकसे (२२, निर्मल भवन, पाचपावली) व सागर उर्फ मंडल्या विजय रंभाड (२३, शास्त्रीनगर, पाचपावली) हे असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दुचाकी व सत्तूर जप्त करण्यात आले.