नागपूर : यशोधरा नगर पोलिसांनी गुंडास तलवार आणि एअरगनसह अटक केली आहे. मो. शब्बीर ऊर्फ सत्तू मो. अयुब (२१, रा. टिपू सुलतान चौक) हा आरोपी आहे. ट्रान्सपोर्ट प्लाझाजवळ सत्तू तलवारीने उत्पात माजवत असल्याचे पोलिसांना कळताच पीआय अशोक मेश्राम, पीएसआय जितेंद्र भार्गव, एएसआय विनोद सोलव, प्रकाश काळे, हवालदार दीपक धानोरकर व त्यांच्या पथकाने सत्तुला अटक केली. तपासणी केल्यावर त्याच्याकडे तलवार व एअरगन आढळून आली. पोलिसांनी सत्तुच्या विरोधात शस्त्र निरोधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
-----------
कुख्यात निंबूवर एमपीडीए
नागपूर : एमआयडीसी भागातील गुंड शुभम ऊर्फ निंबू निंबूलकरला एमपीडीए अंतर्गत तुरुंगात पाठविण्यात आले आहे. विजय नगर, पखिड्डे ले-आउट निवासी निंबूच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, मारझोड आदी प्रकरणांची नोंद आहे. परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. त्यामुळेच पोलीस आयुक्तांनी त्याच्या विरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला नागपूर जेलमध्ये पाठविण्यात आले आहे.
-----------
बुलेटवरून पडल्याने युवकाचा मृत्यू
नागपूर : बुलेटवरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाला. नेताजी नगर निवासी २३ वर्षीय मयूर राजू कापकर, रा. छत्रपती चौक हा खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होता. तो बुधवारी सकाळी १०.३० वाजता गंगाबाई घाट चौक येथून घराकडे जात होता. शास्त्री नगर चौकाजवळ अचानक बुलेट घसरल्याने तो जखमी झाला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयूरने दोन महिन्यांपूर्वीच बुलेट खरेदी केली होती. बुलेटला स्थायी नंबरही मिळाला नव्हता. मुलाच्या मृत्यूमुळे आई-वडील अपघातात आहेत. लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
................