लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोलर इंडस्ट्रीजमधील दुर्घटनेनंतर आपल्या जिवलगाला अखेरचे पाहण्यासाठी नातेवाइकांचे डोळे दिवसभर आसुसलेले होते, तर कालपर्यंत ज्यांच्यासोबत काम करत होतो ते आपल्यात नसल्याचे कळताच कामगारांमध्ये आक्रोश होता. रविवारी दिवसभर कंपनीसमोर वेदना, आक्रोशाचे वातावरण हाेते.
दरम्यान, संतप्त कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर एकत्रित आले होते. काही तरुणांनी अमरावती महामार्ग जाम करण्याचा दोन ते तीनवेळा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी धाव घेत त्यांना पिटाळून लावले. दुर्घटनेनंतर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नागपूर ग्रामीण व वर्धा जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त बोलविण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
आईच्या संघर्षाला फळ येत होतं अन् मोसम गेलावरठी (जि. भंडारा) : स्फोटातील मृतांमध्ये मोसम राजकुमार पटले (वय २४) याचा समावेश असल्याची माहिती मिळताच त्याच्या आईने हंबरडा फोडला अन् काही वेळातच ती निपचित पडली. पाचगाव येथील घर व गाव शोकात बुडालं. मोसमच्या वडिलांचे २०११ मध्ये निधन झाले. त्याच्या आईने मोलमजुरी करून कुटुंब सांभाळले, मोसम व लहान भाऊ सावन यांचे शिक्षण पूर्ण केले. आता आयुष्यात सुख येणार होते. तोच या मोसमच्या जाण्यानं हादरा बसला.
मोसमने काम करत करत अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. प्रशासकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी नागपूर गाठले आणि याच वर्षी सोलर इंडस्ट्रीजमध्ये तो ऑगस्ट २०२३ ला रुजू झाला. त्याचा लहान भाऊ कोल्हापुरात सैन्य भरतीची तयारी करीत आहे.
दुर्घटनेतील मृतांची नावे युवराज किसनाजी चारोडे (बाजारगाव, ता. जि.नागपूर), ओमेश्वर किसनलाल मछिर्के (चाकडोह, ता. जि. नागपूर), मिता प्रमोद उईके (रा. अंबाडा सोनक, ता. काटोल, जि. नागपूर), आरती नीळकंठ सहारे (कामठी मासोद, ता. काटोल, जि. नागपूर), श्वेताली दामोदर मारबते (कन्नमवारग्राम, ता. कारंजा, जि. वर्धा), पुष्पा श्रीराम मानापुरे (रा. तेलीपुरा, शिराला, जि. अमरावती), भाग्यश्री सुधाकर लोणारे (रा. भुजतुकूम, ता. ब्रह्मपुरी, जि.चंद्रपूर), रुमिता विलास उईके (ढगा, ता. कारंजा, जि. वर्धा) व मोसम राजकुमार पटले (रा.नेहरू वॉर्ड,पाचगाव, ता. मोहाडी, जि.भंडारा)
लेकीचा चेहरा पाहू द्या हो... दिव्यांग माय-बाप हळहळलेनागपूर : स्फोटात मृत्यू झालेली आरती निळकंठ सहारे (२२, कामठी मासोद, ता. काटोल) ही तिच्या दिव्यांग आईवडिलांचा आधार होती. त्यांच्यासाठी तिने स्वत:च्या लग्नाकडे दुर्लक्ष केले. लहान बहिणीचे लग्नही लावून दिले. पण हाच आधार गेल्याने आई-वडिलांना हादरा बसला आहे. आरतीच्या आईला बोलता येत नाही. पण तिच्या मनातील आक्रोश अश्रूंवाटे बाहेर येत आहे.
हलाखीच्या परिस्थितीने घेतला भाग्यश्रीचा बळीब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : भूज (ता. ब्रह्मपुरी) येथे सुधाकर लोणारे हे एक मुलगा व एका मुलीसोबत राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पदवीधर भाग्यश्रीने पुण्यातील कंपनीत पाच वर्षे नोकरी केली. नंतर ती बाजारगावातील कंपनीत कामाला गेली. उद्देश हाच की, कुटुंबाला हातभार लागावा, पण रविवारी कंपनीत स्फोट झाला अन् यात भाग्यश्रीचा बळी गेला. ती दोन वर्षांपासून येथे कामाला होती.