नागपूर : ‘होप’ हा हिस्लॉप कॉलेज अॅल्युमिनी असोसिएशन नागपूरचा (एचआयएससीएएएन) प्रायोजकत्व कार्यक्रम असून, हा उपक्रम मागील आठ वर्षांपासून यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यंदा त्याची नववी आवृत्ती आहे. या कार्यक्रमांतर्गत अभ्यासात उत्कृष्ट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची काळजी घेताना कठोर परिश्रमासाठी त्यांना प्रोत्साहन देते.
प्रायोजक विद्यार्थ्यांचा हा दीर्घ प्रवास हिस्लॉप ॲल्युमिनीचा प्रमुख उपक्रम बनला आहे. आतापर्यंत ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेचा वारंवार लाभ देण्यात येत आहे. हा उपक्रम माजी विद्यार्थी आणि हिस्लॉप कॉलेजच्या कर्मचाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे आणि समर्थनामुळे यशस्वी ठरत आहे.
उमेदवारांची निवड करण्यासाठी दोन स्तर आहेत आणि विद्यार्थ्यांना कठोर निवडीचा सामना करावा लागतो. पहिल्या स्तरामध्ये शिक्षकांच्या पॅनेलद्वारे निवड करण्यात येते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुरविलेल्या तपशिलांची पडताळणी कॉलेजच्या नोडल समितीद्वारे करण्यात येते. सर्व कोविड प्रोटोकॉलनंतर फेब्रुवारी महिन्यात निवडलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत झाली. प्राचार्य डॉ. प्रशांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीमध्ये उपप्राचार्य डॉ. रिशी अग्रवाल, डॉ. प्रतीक मायकल, डॉ. दिनी मेनन, डॉ. धनराज माने, डॉ. ममता बाहेती यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये अध्यक्ष विजय नायडू, सचिव डॉ. दीपा जामवाल, संयोजक डॉ. मौसमी भोवळ, सदस्य डॉ. रझेका खान आणि डॉ. अभिलाषा राऊत यांचा समावेश आहे.
निवडीच्या निकषांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पार्श्वभूमी, त्यांची शैक्षणिक प्रवीणता, विद्यमान कौटुंबिक आधार प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या करियरच्या संभाव्यतेची अपेक्षा, भविष्यातील वाढ आणि विकास यांचा समावेश आहे. यावर्षी १०४ विद्यार्थ्यांना ‘होप’ प्रायोजकत्वाखाली समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला पाच हजार रुपये शिष्यवृत्तीचे अनुदान मिळाले. कोविड महामारीमुळे धनादेश वितरण कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे प्रायोजकांची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभार्थी विद्यार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली.