सुदाम राखडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेना संक्रमणामुळे शेतकरी व इतर उद्याेजकांसाेबतच शिंगाडे उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच पावसाला सुरुवात झाल्याने शिंगाडा उत्पादकांनी वेली तलावात पसरवायला सुरुवात केली आहे. सुरादेवी (ता. कामठी) शिवारातील तलावात शिंगाड्यांचे उत्पादन घेतले जात असल्याने या तलावाची यावर्षी २३ भागात विभागणी करण्यात आली आहे.
कामठी-काेराडी मार्गावरील सुरादेवी शिवारातील तलाव ४० एकरात विस्तारला असून, या तलावाची मालकी खासगी आहे. या तलावात दरवर्षी शिंगाड्यांचे उत्पादन घेतले हाेते. सर्वांना या तलावाचा लाभ मिळावा म्हणून दरवर्षी या तलावाची विशिष्ट भागात विभागणी करून ते भाग कहार समाजबांधवांना शिंगाडा उत्पादनासाठी दिले जातात. यावर्षी या तलावाची २३ भागात विभागणी करण्यात आली आहे, अशी माहिती सुरादेवीचे सरपंच सुनील दुधपचारे यांनी दिली.
मुख्यत: पावसाळ्याच्या ताेंडावर तलावात शिंगाड्यांच्या वेली पसरविल्या जात असल्याने कहार समाजबांधवांनी या कामाला तसेच वेलींला खत देण्याच्या कामाला वेग दिला आहे. सप्टेंबरनंतर शिंगाड्यांच्या उत्पादनाला व ते बाजारात यायला सुरुवात हाेते. येथील शिंगाडे दरवर्षी कामठी, काेराडी व नागपूरच्या बाजारपेठेत विक्रीला पाठविले जातात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कहार समाजबांधवांची उपजीविका चालते.
अश्विन नवरात्र उत्सव काळात काेराडी परिसरात माेठ्या प्रमाणात शिंगाडे विक्री हाेत असल्याने तसेच काेराेना संक्रमणामुळे धार्मिक कार्यक्रमांना ‘ब्रेक’ लागल्याने त्याचा कहार समाजबांधवांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काेराेना संक्रमणामुळे शिंगाडे उत्पादक संकटात सापडल्याने राज्य शासनाने उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच सुनील दुधपचारे, श्रीराम दुधपचारे, नामदेव दुधपचारे यांच्यासह सुरादेवी येथील इतर शिंगाडे उत्पादकांनी केली आहे.
...
कहार समाजबांधवांच्या उपजीविकेचे साधन
सुरादेवी येथे कहार समाजबांधवांचे सध्या ५२ कुटुंब वास्तव्याला आहेत. सुरादेवी येथील सरपंचही याच समाजाचा आहे. शिंगाड्यांचे उत्पादन हे या समाजाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असून, त्यांची तिसरी पिढी सध्या शिंगाड्यांचे उत्पादन घेत आहेत. शिंगाडा शेतीला शासनाचे संरक्षण नाही. त्यामुळे शिंगाडे उत्पादकांना शासकीय अनुदान, कर्ज, नुकसान भरपाई यासह तत्सम बाबींचा लाभ मिळत नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती व बाजारातील नुकसानीचा शिंगाडे उत्पादकांना जबर फटका बसताे.
===Photopath===
100621\img_20210408_093422.jpg
===Caption===
सुरदेवी येथील तलावात शिंगाड्याच्या वेली पसरवताना श्रीराम दुधपचारे