नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील मोकाट सुटू पाहणाऱ्या गुंडांना वठणीवर आणण्यासाठी त्यांची रोजच्या रोज झाडाझडती घेण्याचे आणि प्रसंगी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज जारी केले.आजपासून शहरात नव्या दमाने गुन्हेगार दत्तक योजना लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयात यासंबंधाने झालेल्या बैठकीनंतर प्रभारी सहपोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी लगेच गुन्हेगारांच्या कुंडल्या बाहेर काढून संबंधित पोलिस ठाण्यांना त्या पाठवल्या.कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने सात वर्षांच्या आत ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रावधान आहे, अशा गुन्हेगारांना आणि न्यायप्रविष्ट प्रकरणातील कैद्यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक गुन्हेगारांना कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. नागपुरात ६०० गुन्हेगार या निर्णयामुळे कारागृहातून बाहेर आले. त्यातील अनेक गुन्हेगारांनी सर्वसामान्यांना वेठीस धरणे सुरू केले आहे. त्यामुळे हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामाºया, प्राणघातक हल्ले, अशा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात नागपुरात आॅपरेशन क्रॅकडाऊन राबविण्यात आले. मात्र त्यालाही गुन्हेगार जुमानत नसल्याचे लक्षात आल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त डॉ. भरणे यांनी आज प्रदीर्घ बैठक घेऊन शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना नव्या जोमाने लागू करण्याचा निर्णय घेतला.
त्यासंबंधाने सायंकाळपर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार तसेच कारागृहातून बाहेर पडलेल्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आल्या. या याद्या आज रात्री संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आल्या आणि आज रात्रीपासूनच या गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे आदेश देण्यात आले.
अशी आहे योजनासंबंधित गुन्हेगार आज दिवसभर आणि रात्री कुठे होता, त्याने गेल्या २४ तासात काय केले, कुणाला भेटला, कुठे कुठे गेला, ते संबंधित पोलीस ठाण्यातील ६० ते ७० पोलीस कर्मचारी प्रत्येक गुन्हेगाराची प्रत्यक्ष भेट घेऊन तपासणार आहे. रोजच्या रोज प्रत्येक गुन्हेगाराला हिशेब मागितला जाणार आहे.
...तर पोलिसांवर कारवाई!प्रत्येक पोलिसाला त्याच्या क्षेत्रातील चार ते पाच सराईत गुन्हेगारांची झाडाझडती रोजच घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कामात संबंधित पोलिसाने कुचराई केल्यास आणि त्याच्या यादीतील कुण्या गुन्हेगाराने गंभीर गुन्हा केल्यास त्या गुन्हेगारासोबतच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.