नागपूर : लग्नाच्या वरातीत सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवरदेवाला वरातीत लागणारा घोडा. परंतु हा घोडा पुरविणाऱ्या व्यक्तीच्या अंगणातील २ लाख रुपये किमतीचा घोडाच अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १९ एप्रिलला मध्यरात्री २ ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली.
पंकज विनायक पडोळे (४३, रा. आदिवासी सोसायटी, वृंदावन कॉलनी गिट्टीखदान) यांचा लग्नात घोडे पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन घोडे आहेत. त्यांनी हे दोन्ही घोडे आपल्या अंगणात बांधून ठेवले होते. परंतु अज्ञात आरोपीने शनिवारी मध्यरात्री यातील पांढऱ्या रंगाचा नुखऱ्या जातीचा घोडा चोरून नेला. या घोड्याची किंमत २ लाख रुपये आहे.
सकाळी उठल्यानंतर पडोळे यांना आपल्या अंगणातील घोडा जागेवर दिसला नाही. त्यांनी घोड्याचा शोध घेतला असता घोडा कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्यांनी गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. गिट्टीखदान ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.