लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परत एकदा लेटलतिफ कामाचे उदाहरण दाखवून दिले आहे. राज्यपाल कार्यालयाकडून मागील महिन्यात निवडणूक साक्षरतेबाबत आलेल्या पत्राला विद्यापीठाने अगोदर गंभीरतेने घेतले नाही. वेळेवर महाविद्यालयांना पत्र पाठवून निवडणूक साक्षरता मंडळ स्थापण्याचे निर्देश दिले. आश्चर्याची बाब म्हणजे यासाठी १५ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती व संकेतस्थळावर १८ ऑगस्ट रोजी पत्र अपलोड करण्यात आले. हा वरातीमागून घोडे असाच प्रकार असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे.
विद्यार्थ्यांमध्ये मतदानासंदर्भात जागृती वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांत निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली होती. राज्यपालांनी यासंदर्भात ७ जुलै रोजी पत्र लिहीले तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून २३ जुलै रोजी पत्र आले. संबंधित पत्रांवर विद्यापीठाने तातडीने पावले उचलली नाहीत. अखेर १३ ऑगस्ट रोजी विद्यार्थी विकास संचालक डॉ.अभय मुद्गल यांनी पत्र जारी केले. यानुसार महाविद्यालयांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करावी व विद्यापीठातील नोडल अधिकाऱ्याकडे त्याची जबाबदारी देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. याचा अहवाल १७ जुलैपर्यंत पाठविण्याबाबतदेखील सांगण्यात आले. प्रत्यक्षात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र हे पत्र १८ जुलै रोजी अपलोड करण्यात आले. विद्यापीठातील अधिकारी पत्रांतील तारखा, मुदत वाचतात की नाही असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.
महाविद्यालयांकडून नाराजी
१३ ऑगस्ट रोजी पत्र जारी झाले व काही महाविद्यालयांना ते ई-मेलवर पाठविण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार होता व बहुतांश ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची तयारी होती. १५ ऑगस्टला सुटीच होती. विद्यापीठांना या अडचणींची माहिती नसते का अशी नाराजी महाविद्यालयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.