नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी झालेल्या निवडणूकीत त्यांची एकमताने निवड झाली.
संघात सरसंघचालकांचे पद हे मार्गदर्शक म्हणून असते तर सरकार्यवाहांच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष कार्याची आणखी होत असते. संघात दर तीन वर्षांनी सरकार्यवाह पदासाठी निवडणूक होते. रविवारी प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला व सर्वांनी त्याला अनुमोदन दिले. २०१८ साली होसबळे सरकार्यवाह झाले होते. दरम्यान, संघ संघटनेच्या दृष्टीने आणखी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे.
पश्चिम क्षेत्राचे प्रचारक अतुल लिमये व अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख आलोक कुमार यांच्याकडे सहसरकार्यवाहपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मितभाषी व कुशल संघटक असलेले लिमये हे मुळचे पुण्याचे असून त्यांनी संघात विविध दायित्व सांभाळले आहेत. तर दुसरीकडे टेक्नोसॅव्ही असलेले आलोक कुमार यांच्याकडे अगोदर पश्चिम उत्तरप्रदेशचे क्षेत्रप्रचारक म्हणून जबाबदारी होती. संघात आता सहसरकार्यवाहांची संख्या सहा इतकी झाली आहे. डॉ.मनमोहन वैद्य यांना सहसरकार्यवाह पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
असे आहेत संघाचे सहसरकार्यवाह- डॉ.कृष्णगोपाल- अरुण कुमार- मुकुंदा सी.आर.- रामदत्त चक्रधर- अतुल लिमये- आलोक कुमार