लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकट्या नागपुरात १०५वर रुग्णांची नोंद झाली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण उपचाराखाली आहेत. असे असताना, यातील काही रुग्णालये डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीची केंद्र ठरले आहे. महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने केलेल्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली. शहरातील तब्बल १४वर इस्पितळांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यामुळे हॉस्पिटलच उठले रुग्णांच्या जीवावर असे बोलले जात आहे.पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डेंग्यू हा विषाणूजन्य (व्हायरल इंफेक्शन) आजार आहे. ‘एडिस’ डासाच्या चावण्याने हा आजार होतो. डेंग्यूचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त गंभीर होतो. मात्र, जुन्या चुकांमधून धडा घ्यायला कोणीच तयार नाही. डेंग्यू डासांचा समूळ नाश करण्याची जबाबदारी सर्वांची असताना केवळ आरोग्य विभागावर जबाबदारी ढकलली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात असल्याचे वास्तव आहे. महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडून घराघरांसोबतच, शाळा-महाविद्यालये, खासगी संस्था व रुग्णालयांची तपासणी सुरू असलीतरी याचा विशेष फायदा होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. या तपासणीदरम्यान कुलर्स, टाक्या, रिकामे डबे, फुलदाणी, कुंड्यामध्ये आढळून आलेल्या डासांच्या अळ्या संबंधितांना दाखवून व त्यावर आवश्यक उपाययोजना करूनही पुन्हा-पुन्हा तेच-तेच ठिकाण डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनू पहात आहे. मुंबईमध्ये असे दूषित घर, संस्था व रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागपुरात याला अद्यापही सुरूवात झाली नाही. परीणामी बेफिकीरीचे वातावरण आहे. साधी नोटीसही दिली जात नसल्याने डेंग्यू दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करीत आहे.लहान मुलांचे इस्पितळेही दूषितमहानगरपालिकेकडे नोंद झालेल्या १०५ डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ४३वर रुग्ण हे शुन्य ते १४ वयोगटातील आहे. सध्याच्या घडीला मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयांमध्ये २५वर बाल रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु या रुग्णालयांसोबतच काही खासगी बाल रुग्णलायात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने तपासणी करणारे हिवताप व हत्तीरोग विभागही हादरून गेले आहे.रुग्णांच्या संख्येला घेऊनही घोळमनपा केवळ ‘एलायझा’ चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचीच नोंद घेते. प्रत्यक्षात मात्र शासकीयसह सर्व खासगी इस्पितळांमध्ये ‘एनएस१’, ‘आयजीएम’ व ‘आयजीजी’ ही चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाला डेंग्यू म्हणूनच उपचार केला जातो. यामुळे मनपाच्या संख्येपेक्षा कित्येक पटीने शहरात रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, यातील गंभीर रुग्णांचे मृत्यू झाले असताना आरोग्य विभागाकडे एकाही मृत्यूची नोंद नाही.या हॉस्पिटलमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्याइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो),शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल),ईशा हॉस्पिटल, शारदा चौक,मातृसेवा संघ हॉस्पिटल,केशव हॉस्पिटल, श्रीनगर, माधव चाईल्ड केअर हॉस्पिटल, सेवादलनगर,ओंकार प्रसूती गृह, शिवशक्तीनगर, पुष्पचक्र हॉस्पिटल, राधाकृष्ण हॉस्पिटल, कलर्स हॉस्पिटल,निती गौरव कॉम्प्लेक्स (पाचवर हॉस्पिटल), अश्विनी किडनी केअर हॉस्पिटल