सुमेध वाघमारे/आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मोठा गाजावाजा करीत मागासवर्गीय मुलीसाठी चार नवीन वसतिगृह सुरू करण्यात आले. परंतु ते सुरू करताना कुठलेही नियोजन नसल्याने घाईगडबडीत सुरू झालेल्या या वसतिगृहांमध्ये सोयी-सुविधांची बोंब आहे. कपाट, टेबल खुर्ची, निर्वाह भत्त्यासह स्टेशनरीचे पैसे मिळविण्यासाठी विद्यार्थिनींना आटापिटा करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.राज्य सरकारतर्फे २०१५ हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) सुरु करण्यात आलेल्या चारपैकी एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह डिगडोह सीतानगर येथे ८ मार्च २०१६ रोजी सुरु करण्यात आले. या वसतिगृहाला स्वत:ची इमारत नाही. भाड्याच्या इमारतीत वसतिगृह सुरू आहे. या वसतिगृहात १०० मुलींच्या प्रवेशाची मान्यता आहे. परंतु वसतिगृहात केवळ ८५ मुलींचीच प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे येथे केवळ ८५ मुली आहेत. वसतिगृह सुरू झाले तेव्हा बार्टीकडून काही अनुदान मिळाले होते. त्यातून केवळ वसतिगृहाचे भाडे, मुलींसाठी पलंग, गाद्या याच सुविधा उपलब्ध करून देता आल्या. या वर्षीचे अनुदान मिळालेच नाही.त्यामुळे शैक्षणिक साहित्य, गणवेश आदींसाठी सर्वांनाच अनुदानाची प्रतीक्षा आहे.१५ लाखाचे अनुदान प्रलंबितया वसतिगृहाचे जवळपास १५ लाखाचे अनुदान प्रलंबित आहे. त्यामुळे मेस कंत्राटदार, वीज, पाणी, विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्याचे बिल प्रलंबित आहे.मेस कॉन्ट्रॅक्टरचे बिल वर्षभरपासून थकीतवसतिगृह सुरू झाले तेव्हापासून येथील मेस कॉन्ट्रॅक्टरला एक नवीन रुपयाही मिळालेला नाही. वर्षभरापासून त्यांचे बिल पेंडिंग आहे. शासकीय काम असल्याने ते आज ना उद्या मिळेलच या अपेक्षेने मेस कॉन्ट्रॅक्टर थांबून आहे. परंतु त्यांनाही मर्यादा आहे. असे असले तरी येथील मेस चालकाने कधी मुलींना उपाशी राहू दिले नाही, असे येथील मुलींनी आवर्जून सांगितले.फर्निचर मिळालेच नाहीवसतिगृह सुरू झाले, तेव्हापासून वसतिगृहाला फर्निचर मिळालेलेच नाही. टेबल खुर्ची नाही. पुस्तके ठेवायचे शोकेस नाही. त्यामुळे येथील ग्रंथालय केवळ नावाचेच आहे. ग्रंथालयात पुस्तक ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याने येथील पुस्तके गृहपालांच्या कार्यालयात ठेवावी लागतात.संगणक व टीव्हीची प्रतीक्षाशासकीय नियमानुसार दहा विद्यार्थिनीमागे एक संगणक असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थिनींच्या मनोरंजनासाठी टीव्ही असावा. परंतु या वसतिगृहात या दोन्ही सुविधा नाही. येथील विद्यार्थिनींना याची प्रतीक्षा आहे.उन्हाळ्यात पाण्याची टंचाईवसतिगृहातील पाण्याच्या सुविधेसाठी नळ व विहिरीची सुविधा आहे. परंतु उन्हाळ्यात येथील विहीर आटते. तेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते. टँकर बोलवावा लागतो.शासकीय इमारतीसाठी जागा मंजूरसीतानगर येथील वसतिगृहासाठी शासनाने वानाडोंगरी येथे जागा मंजूर केली असल्याचे सांगितले जाते. परंतु जागा मंजूर करून होणार नाही. वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी शासनाने तातडीने पाऊल उचलल्याची गरज आहे. तसेच सर्व सुविधा निर्माण केल्यावरच वसतिगृह सुरू व्हावे, अशी विद्यार्थिनींची अपेक्षा आहे.इमारतीतील दोन खोल्या मिळाल्यास १०० ची संख्या पूर्णवसतिगृहाला १०० विद्यार्थिनींची मान्यता आहे. परंतु सध्या येथील विद्याथिनींची क्षमता ८५ इतकी आहे. इमारतीमध्ये २१ खोल्या आहेत. यात प्रत्येकी चार ते पाच विद्यार्थिनी एका खोलीत असतात. वरच्या माळ्यावर दोन खोल्या आहेत. त्या घरमालकाच्या ताब्यात आहेत. त्या दोन खोल्या मिळाल्यास १०० विद्यार्थिनीना प्रवेश देता येऊ शकतो यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.आर्थिक तरतूद महत्त्वाचीवसतिगृह सुरू झाले. पण त्यासाठी आर्थिक तरतूद महत्त्वाची आहे. पैशाअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आम्हीही हतबल असतो. क्रेडिटवर पुस्तके वगैरे उपलब्ध करून देता येऊ शकतात. पण इतर शैक्षणिक साहित्यासाठी मोठी अडचण जाते. तेव्हा आर्थिक तरतूद आवश्यक आहे.- के.डब्ल्यू. पाटील, गृहप्रमुख
ग्रंथालय नावाचेच, पुस्तके कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 1:38 AM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मोठा गाजावाजा करीत मागासवर्गीय मुलीसाठी चार नवीन वसतिगृह सुरू करण्यात आले.
ठळक मुद्देअनुदानाची प्रतीक्षा : सीतानगर येथील वसतिगृहातील विद्यार्थिनी त्रस्त