नागपूर: मुंबई-हावडा मेलच्या कोचखाली हॉट एक्सेल (चाकांमधून निघणारी आग) होत असल्याने, ही ट्रेन ठिकठिकाणी रेंगाळली. यामुळे आज ही ट्रेन नागपुरात तब्बल सात तास उशिराने पोहचली आहे.
हावडा मुंबई मेल शुक्रवारी रात्री मुंबईतून नागपूरकडे निघाली. काही अंतरावरच या ट्रेनच्या ए-१ कोचच्या चाकांमधून धूर उठू लागला. त्यानंतरही ही ट्रेन तशीच पुढे धावू लागली. कल्याण स्थानकावर ट्रेन पोहचली तेव्हा ट्रेनमधील धूर आणखी मोठा झाला होता. मात्र, तरीही ट्रेन तशीच पुढे निघाली. त्यानंतर चाकातून चक्क आग निघू लागली. आता मात्र ही ट्रेन आसनगावमध्ये थांबवून दुरुस्तीचे काम करण्यात आले. परिणामी ही गाडी विलंबाने धावू लागली. रोज सकाळी ११ वाजता पोहचणारी ही रेल्वेगाडी आज ७ तास विलंबाने नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचली.
त्याचप्रमाणे तांत्रिक अडचणीमुळे मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेससुद्धा ६ तास विलंबाने नागपुरात पोहचली. परिणामी नागपुरातून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेसही विलंबाने निघाली. यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला.