नागपूर : एकिकडे नैऋत्य मान्सून विदर्भासह महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे ऑक्टाेबरच्या हीटने नागरिकांची हाेरपळ हाेत आहे. तापमान सरासरीच्या वर सुरू असून उकाड्यामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत. उकाड्यामुळे पंखे, कुलर, एसीचा वापर वाढला आहे.
पावसाळ्याचा यंदाचा नैसर्गिक कार्यकाळ पूर्ण झाला असून हळूहळू त्याने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यात ५ ऑक्टाेबरपासून हा प्रवास सुरू झाला व येत्या दाेन-तीन दिवसात बहुतेक भागातून त्याने गाशा गुंडाळलेला असेल. दरम्यान सप्टेंबरमध्ये मान्सूनचे शेवटचे आवर्तन झाल्यानंतर ऑक्टाेबरमध्ये पावसानेही शेवटचा ‘गुडबाय’ केल्याची स्थिती आहे. संपूर्ण आठवड्यात एकदाही हजेरी लावली नाही. ५ ऑक्टाेबरला सायंकाळी हलक्या सरी बरसल्या असल्या तरी त्यात पावसाळ्याचा ‘फिल’ नव्हता. उलट वाढलेल्या उन्हाच्या झळांनी उकाड्याचा त्रास सुरू केला आहे.
दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या वर चालत आहे. साेमवारी नागपूरचा पारा अंशत: घटला असला तरी ३५.१ अंशावर नाेंदविला गेला. विदर्भात अकाेला सर्वाधिक ३७.८ अंश व ब्रम्हपुरी ३६.२ अंशाची नाेंद झाली. हलक्या पावसाळी आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे कुलर, एसीचा वापर अधिकच वाढला आहे. त्यामुळे वीजेची मागणीही वाढली आहे.
तीन दिवस विजांचा कडकडाटदरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ८, ९ व १० ऑक्टाेबरला वादळासह विजांचा कडकडाट हाेण्याची शक्यता आहे. परतीचा प्रवासाचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे.