लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेत सध्या पदाधिकारी आणि विरोधकांत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर, अध्यक्षांनी प्रसिद्धीसाठी बदनामी करीत असल्याचा आरोप केला होता. परत विरोधकांनी अध्यक्षांचा आरोप फेटाळत घबाडाचे पुरावे देतो असा दावा केल्याने या वादात पुन्हा ठिणगी पाडली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपावर अध्यक्षांनी आपली भूमिका मांडून विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते प्रसिध्दीसाठी आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे त्यांनी पत्रपरिषद घेऊन सांगितले. त्यानंतर पुन्हा विरोधी पक्षनेते अनिल निधान व इतर सदस्यांनी अध्यक्षांसह सत्ताधाऱ्यावर हल्ला चढवित आम्ही केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे चुकीचे नसून, त्यासंदर्भातील पुरावेही आमच्याकडे असल्याची माहिती दिली. शिक्षण विभागाने ‘जेम’ पोर्टलवरुन खरेदी केलेल्या साहित्याची व दुकानात प्रत्यक्ष त्या साहित्याच्या किमतीत मोठी तफावत आहे. जर या खरेदीत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नसेल तर चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी का करीत आहात? अद्यापपर्यंत त्या पुरवठादाराचे देयक का रोखले आहेत? असा सवाल केला.
कोरोना काळात विरोधक कुठेच दिसले नाही, असे अध्यक्ष म्हणाल्या. त्यावर विरोधकांनी आरोप केला की अध्यक्षांनी फक्त त्यांच्याच तालुक्यात दौरे केले. अध्यक्षच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्रीही ग्रामीण भागात कोरोना काळात फिरकले नाही, असाही आरोप विरोधकांनी केला.
आमच्याकडे सीडीआर आहेत
दोन सप्लायरकडून झेरॉक्स मशीनसाठी फोन आले होते. आमच्याकडे त्याचा सीडीआर आहे, असाही दावा विरोधकांनी केला.
विरोधक सत्ताधाऱ्यांना मॅनेज झाले होते
भाजपा ७ वर्षे सत्तेत असताना विरोधकांना कक्ष मिळाला नाही. कारण तेव्हा विरोधक मॅनेज झाले होते. आम्ही मॅनेज न होता जनतेच्या हक्कासाठी सातत्याने भांडत राहू, असे निधान म्हणाले.