लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठीमधील रनाळा येथील लॉजमध्ये सुरूअसलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीला अटक केली. झोन पाचच्या पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या तावडीतून अल्पवयीनसह एका तरुणीची मुक्तता करण्यात आली. सय्यद सरफराज ऊर्फ सोनू अली सय्यद आसिफ अली (२७) रा. इतवारी स्टेशन, मोंटू बाबुराव ठाकूर (३१) रा. कोहिनूर लॉनजवळ वाठोडा आणि अभिषेक रमेश पाटील (३१) रा. कामठी अशी आरोपीची नावे आहे.झोन पाचच्या पोलीस दलाला सोनू आणि मोंटू हे देहव्यापार करीत असल्याची माहिती मिळाली. ते दोघे मंगळवारी सायंकाळी रनाळा येथील हॉटेल रिलॅक्स लॉजिंग अॅण्ड बोर्डिंगमध्ये देहव्यापारासाठी येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला. या अड्ड्याचा सूत्रधार मोंटू आहे. तर सोनू ऑटोचालक आहे. सोनूने ऑटोमध्ये एक तरुणी आणि १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आणले. त्याने दीड हजार रुपयात डमी ग्राहकासोबत सौदा केला. त्या ग्राहकाकडून हॉटेलच्या मॅनेजरने खोलीच्या भाड्याचे एक हजार रुपये घेतले. कुठल्याही दस्तावेजाची पाहणी न करता हॉटेलची खोली उपलब्ध करून दिली. डमी ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी धाड टाकून तिघांनाही अटक केली. ऑटोमध्ये बसलेल्या मुलीची विचारपूस केली असता ती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. तर देहव्यापार करीत असलेली तरुणी विवाहित आहे. ती तीन वर्षांपासून या धंद्यात आहे.सोनू-मोंटू अनेक वर्षांपासून देहव्यापाराचा अड्डा चालवतात. ग्राहकाकडून वसूल करण्यात आलेली रकम पीडित आणि सोनू-मोंटू बरोबरीत वाटून घेतात. अल्पवयीन मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई मजुरी करते. आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे अल्पवयीन मुलीने शाळा सोडली. आरोपींनी पैशाचे आमिष दाखवून तिला आपल्या टोळीत सामील करून घेतले. ती दोन महिन्यापासून आरोपींशी जुळली आहे. आरोपींविरुद्ध अनैतिक देह व्यापार विरोधी कायदा (पीटा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई झोन पाचचे डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बापू ढोरे, एपीआय ओमप्रकाश सोनटक्के, पीएसआय जितेंद्र ठाकूर, कर्मचारी राजकुमार जनबंधू, महेश बावणे, सूरज भारती, दिनेश यादव, प्रभाकर मानकर, मृदुल नगरे, रवींद्र राऊत आणि सुजाता यांनी केली.