योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उधारीच्या वादातून एका हॉटेलमालकावर चाकूने वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
शफीक खान उर्फ अजीज खान (३५, तोहीत नगर, मोठा ताजबाग) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते मोठा ताजबाग परिसरात अलबीलाल नावाचे हॉटेल चावलतात. हॉटेलसाठी लागणारा माल तो मोहम्मद आसीफ उर्फ मोनू उर्फ मोहम्मद अनीस शेख (३३, हसनबाग) याच्याकडून खरेदी करतो. कोरोनाच्या कालावधीत खरेदी केलेल्या मालाचे एक लाख रुपये शिल्लक होते. त्यावरून आसीफ सातत्याने शफीकला पैशांची मागणी करत होता. रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी आसीफ हा शफीकच्या घरासमोर गेला व बोलायचे आहे असे म्हणत गाडीवर बसवून तोहीतनगर येथील गॅस गोडावूनसमोर घेऊन आला. त्याने उधारीचे पैसे परत मागितले. यावर शफीकने थोडा वेळ दे असे म्हटले. यावरून संतापलेल्या आसीफने थेट त्याच्या छातीवरच चाकूने वार केला. प्रसंगावधान राखून शफीकने चाकू पकडला. मात्र आरोपीचा मोठा भाऊ मोहम्मद अनीस उर्फ अन्नू तसेच मित्रांनी येऊन त्याला पकडले व बेदम मारहाण केली. आरोपीने शफीकच्या मानेवर व बगलेत वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून वस्तीतील लोक जमा झाले. त्यामुळे आरोपी फरार झाले. पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली व जखमी अवस्थेतील शफीकला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोहम्मद आसीफ व दानिश ईमरान खान या दोन आरोपींना अटक केली आहे.