लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरव्ही शहरातील हॉटेल्समधील सुट्स बुकिंग करताच सहजपणे उपलब्ध होतात. मात्र सध्या निवडणुकीच्या दिवसात चित्र वेगळे आहे. ऑनलाईनवर अनेक हॉटेल्समधील सुट्स रिकामे दिसत असले तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. रिसेप्शन काऊंटरवर गेल्यावर सुट हाऊसफुल असल्याचे कळत आहे. याची झळ निवडणुकीसाठी आलेल्या बाहेरगावातील अनेक राजकीय नेत्यांनाही बसत आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला असून मतमोजणी २४ ला आहे. शहरातील सहा आणि ग्रागीण नागपूरमधील सहा अशा १२ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणांहून राजकीय मंडळीची ये-जा वाढली आहे. त्याच्या मुक्कामासाठी कार्यकर्ते हॉटेल्स शोधत असताना ही स्थिती पुढे आली आहे.शहरातील तारांकित हॉटेल्ससह अन्य लहान हॉटेल्समध्येही हीच स्थिती आहे. हॉटेल व्यवसायाशी संबंधित जाणकारांच्या माहितीनुसार, अनेक हॉटेल्समध्ये खोल्या खाजगी भागीदारी तत्त्वावर लीजवर देण्यात आल्या आहेत. यामुळे हॉटेल मालक आणि खाजगी भागीदारांमध्ये ठरल्यानुसार सुट्सची वाटणी झाली आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर, १०० खोल्यांच्या हॉटेलमध्ये खाजगी भागीदाराजवळ ४० आणि हॉटेल मालकाकडे ६० खोल्या असतील आणि हॉटेल मालकाकडील खोल्या बुक झाल्या असतील व खाजगी भागीदाराकडे खोल्या उपलब्ध असतील तर त्या ऑनलाईनवर रिक्त दाखविल्या जातात. रिसेप्शन काऊंटरवर विचारणा केल्यावर मात्र खोल्या नसल्याचे सांगितले जाते.निवडणूक प्रचारासाठी नेते, कार्यकर्ते मुक्कामी आहेत. प्रत्यक्षात शहरातील सर्वच हॉटेल्स हाऊसफुल नाहीत. ठराविक हॉटेल्समध्येच खोल्या बुक असल्याचे ऑनलाईनवर दिसत आहे. अॅडव्हान्स बुकिंग झाले असल्याने अनेकदा खोल्या रिकाम्या असूनही अन्य ग्राहकांना त्या देण्यास नकार द्यावा लागतो.- तेजिंदरसिंह रेणु, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.
निवडणुकीच्या दिवसात हॉटेलमधील सूट होताहेत हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:24 AM
ऑनलाईनवर अनेक हॉटेल्समधील सुट्स रिकामे दिसत असले तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. रिसेप्शन काऊंटरवर गेल्यावर सुट हाऊसफुल असल्याचे कळत आहे. याची झळ निवडणुकीसाठी आलेल्या बाहेरगावातील अनेक राजकीय नेत्यांनाही बसत आहे.
ठळक मुद्दे ऑनलाईनवर चित्र वेगळेआगंतुकांना बसतेय झळ