नागपूर : गेल्या वर्षापासून आर्थिक नुकसानीत असलेले हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशने (व्हीटीए) जिल्हाधिकारी विमला आर यांना सोपविले. यासोबतच अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री ८ पर्यंत सुरू ठेवावी, अशीही मागणी केली.
व्हीटीएचे अध्यक्ष अध्यक्ष श्रवणकुमार मालू यांच्या नेतृत्त्वातील प्रतिनिधी मंडळाने नवनियुक्त जिल्हाधिकारी विमला आर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. नागपुरातील बाजारपेठांची वेळ दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत वाढविण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. याकरिता मालू यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, कोविडमुळे हॉस्पिटॅलिटी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. नुकसान काही प्रमाणात भरून निघण्यासाठी हॉटेल्स व रेस्टॉरंट रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देऊन व्यावसायिकांना दिलासा द्यावा.
जिल्हाधिकारी म्हणाले, दुकानांची वेळ वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण राज्य सरकार कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने चिंतेत आहे. अखेर सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच निर्णय घेता येईल.
प्रतिनिधी मंडळात हेमंत त्रिवेदी, पवन के. चोपडा, अमरजितसिंह चावला व राजेश कानूनगो उपस्थित होते.